नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) होणाऱ्या शवविच्छेदन अहवालाची स्थिती आता एका क्लिकवर पोलीसांसह नातवाईकांनाही कळणे शक्य होणार आहे. एम्सद्वारे तयार पोर्टलवर ही माहिती अपलोड केली जाईल. त्यामुळे हे अहवाल तयार झाले काय? यासाठी पोलीसांसह नातेवाईकांची रुग्णालयातील पायपीट थांबणार आहे. या पोर्टलबाबत आपण अधिक जाणून घेऊ या.
एम्स रुग्णालयात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलांगणा राज्यातील अत्यवस्थ रुग्ण उपचाराला येतात. त्यापैकी पोलीस नोंद असलेल्या, अपघाताचे रुग्ण, अनोळखी व्यक्ती, संशयास्पद मृत्यू असलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केले जाते. हे शवविच्छेदन अहवाल एम्सच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडून केवळ पोलिसांना उपलब्ध केले जातात. न्यायालयीन प्रक्रियेसाठी हे अहवाल खूपच महत्वाचे आहे. यापूर्वी हे अहवाल तयार झाले का, याबाबत पोलिसांसह नातेवाईकांना कल्पना नसल्याने ते वारंवार रुग्णालयात पायपीट करत होते. त्यावर एम्सच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी पोर्टलच्या माध्यमातून हे अहवाल पूर्ण झाले की नाही? ही माहिती देण्याच्या अभिनव कल्पनेवर काम सुरू केले. त्यानुसार आता पोर्टलचे काम सुरू झाले असून त्यावर ‘क्लिक’ करताच संबंधित शवविच्छेदन अहवाल पूर्ण झाला की नाही? हे दर्शवले जाणार आहे. त्यामुळे पोलीसांसह संबंधित नातेवाईकांना ही माहिती कळणार असल्याने कालांतराने त्यांना विविध कामासाठी लागणारे हे अहवाल वेळीच एम्समधून गोळा करता येणार आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
या पोर्टलचे उद्घाटन एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांच्या हस्ते केले गेले. याप्रसंगी डॉ. सिद्धार्थ द्विभाषी, डॉ. गणेश डाखले, डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. राजरत्न वाघमारे, डॉ. श्रीराम गोगुलवार, डॉ. याज्ञिक वाझा, डॉ. शर्वरी म्हापणकर उपस्थित होते.
अनोळखी व्यक्तीचे छायाचित्रही अपलोड होणार
अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पोलिसांकडून हे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले जातात. शवविच्छेदनानंतर संबंधिताच्या नातेवाईकाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात. नातेवाईक भेटल्यास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या स्वाधीन केले जातात. परंतु, विशिष्ट काळात नातेवाईक न भेटल्यास पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जातात. एम्सच्या या पोर्टलवर अनोळखी व्यक्तीचे व त्याच्याकडे मिळालेल्या साहित्याचेही छायाचित्र अपलोड केले जाणार आहे. त्यामुळे कुणाला नातेवाईक भेटत नसल्यास या संकेतस्थळावर छायाचित्राद्वारे त्याची ओळख पटवता येणार आहे.
हेही वाचा…सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
एम्समध्ये होणाऱ्या शवविच्छेदनाची स्थिती नातेवाईक व पोलिसांना आता घरबसल्या मिळणार नसल्याने त्यांना रुग्णालयात चकरा मारण्याची गरज नाही. प्रत्येक १५ दिवसांत हे पोर्टल अपडेट केले जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. डॉ. मनीष श्रीगिरीवार, विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, एम्स, नागपूर.