मुलाच्या लग्नाच्या चार दिवसांपूर्वी कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना नागपुरातील लकडगंज हद्दीत जुनी मंगळवारी येथील ढिवर मोहल्ल्यात घडली. छाया बोरीकर (५२) असे मृत पत्नीचे तर रामदास बोरीकर (६०) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीकर दाम्पत्यांना सतीश आणि राकेश अशी दोन मुले आहेत. रामदास याचे पुस्तकाचे दुकान होते. बोरीकर दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कलहातून नेहमीच वाद व्हायचे. त्यामुळे २०१७ मध्ये पत्नी छाया ही दोन मुलांना घेऊन वेगळी राहत होती.
९ जून रोजी मुलगा सतीशचे लग्न होते. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी सतीश वडिलांच्या घरी गेला आणि लग्नासाठी आईकडे राहायला येण्याचा आग्रह करू लागला. त्यावर रामदासने लग्नाला उपस्थित राहण्यास नकार दिला. ही माहिती सतीशने आईला दिली. छाया यांनी पतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत रामदासने चाकू काढून छायाच्या पोटावर आणि चेहऱ्यावर वार करून त्यांना जागीच ठार केले व थेट लकडगंज पोलीस ठाण्यात पोहचला. पत्नीचा खून केल्याची कबुली देताच पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले.