नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ताराबोडी परिसरात हा अपघात झाला असून भरधाव वेगात एका कारनं ट्रकला धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व सहा जण हे नागपूरच्या काटोल तालुक्यातील रहिवासी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी १५ डिसेंबरच्या मध्यरात्री सोनखांब ते ताराबोडीदरम्यानच्या भागात ही अपघाताची घटना घडली. नागपूरमधून सहा जण एक लग्नसोहळा आटोपून रात्री पुन्हा आपल्या गावी परत जात होते. त्यांची कार भरधाव वेगात असताना एका ट्रकला वेगाने धडकली. या अपघातात कारचा चुराडा झाला. ट्रकच्या उजव्या भागाचंही मोठं नुकसान झालं. कारमध्ये बसलेल्या सहा जणांचा यात मृत्यू झाला. गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचं नागपुरात लग्न होतं. त्यासाठी हे सर्वजण नागपूरला गेले होते.

या अपघातात मयूर इंगळे (२२), वैभव चिखले (३२), सुधाकर मानकर (४२), विठ्ठल थोटे (४५), अजय चिखले (४०) व रमेश हेलोंडे यांचा मृत्यू झाला. जगदीश ढोणे यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृत व जखमी असे सर्वजण मेंढेपठार गावातील रहिवासी होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur katol accident news six died on the spot as truck hit car pmw