नागपूर : महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राख कन्हान नदीच्या पाण्यात मिसळल्याचे पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) पथक महानिर्मितीच्या खापरखेडा केंद्रात धडकले. पथकाने कन्हान नदीतील पाण्याचे नमुनेही गोळा केले आहे. या प्रकरणात आता कारवाईची शक्यता आहे.

खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, खापरखेडा प्रकल्पाचा राखेचा तलावासह कन्हान नदीच्या पाण्यात राख मिश्रित झालेल्या भागाला एमपीसीबीच्या दोन अधिकाऱ्यांच्या चमूने भेट दिली. चमूकडून कन्हान नदीच्या राख मिश्रित झालेल्या भागाची पथकाकडून तपासणी करत येथील नदीच्या पाण्याचे नमुनेही गोळा करण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे. त्याच्या अहवालानंतर पाण्यात राखेच्या प्रमाणाबाबत माहिती स्पष्ट होईल. दुसरीकडे पथकाकडून खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प प्रशासनाला येथील पाण्यात राख मिश्रित होऊ नये म्हणून आवश्यक उपाय करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान पथकाला तपासणीदरम्यान येथील राख स्वच्छ करण्याचे प्रयत्न महानिर्मितीकडून सुरू झाल्याचेही निदर्शनात आले. पथकाने घटनास्थळी भेट देत कन्हान नदीच्या पाण्याचे नमुने गोळा केल्याच्या वृत्ताला एमपीसीबीच्या नागपूरच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी दुजोरा दिला.

हेही वाचा – लोकजागर: ‘हिंदूशेरणी’चे हरणे…

प्रकरण काय?

नागपूरसह परिसरात गेल्या एक- दोन दिवसांत पाऊस पडत आहे. त्यामुळे कन्हान नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. १ जुलैच्या दुपारी कन्हान जल शुद्धीकरण केंद्राच्या (डब्लूटीपी) जलवसाहतीच्या विहिरीजवळ नदीत ओसीडब्लू कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख पडलेली आढळली. अधिकाऱ्यांकडून या राखेचा स्त्रोत शोधण्याचे काम हाती घेतले गेले. त्यात महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या वारेगाव राखेच्या तलाव आणि वारेगाव येथील खासगी राखेपासून तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्रासाठीच्या राख साठवणूक केंद्रातून ही राख नदीत येत असल्याचे स्पष्ट आले. या राखेमुळे नदीतील पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बघत तातडीने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही राख नदीच्या पाण्यात जाण्यापासून थांबवण्यासाठी आवश्यक उपाय करण्याची विनंती केली गेली.

हेही वाचा – ‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रे जमवायला जाताना अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार

कन्हान जल शुद्धीकरण केंद्र २५ टक्के क्षमतेवरच

औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कन्हान शुद्धीकरण केंद्र सध्या त्याच्या मूळ क्षमतेच्या दोन तृतीयांश क्षमतेनेच कार्यरत आहे. या अर्धवट पंपिंगमुळे आशी नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन आणि नेहरू नगर झोनचा समावेश असलेल्या कन्हान फीडरच्या मुख्य भागातून पुरवल्या जाणाऱ्या कमांड एरियामध्ये राहणाऱ्या ग्राहकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याचे ओसीडब्लूचे म्हणने आहे. आवश्यक दुरुस्ती व उपायानंतर हा पुरवठा पूर्ववत होणार असल्याचेही ओसीडब्लूचे म्हणणे आहे.