नागपूरः मित्रांनी दारूच्या वादातूनच वानाडोंगरी परिसरात कुणाल ऊर्फ बॅटरी सुनील कन्हेरे या गुंडाची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासातच दोन आरोपींना अटक केली.
हेही वाचा – महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक
हेही वाचा – नागपूर : झोमॅटो बॉयला चाकूच्या धाकावर लुटले…
एमआयडीसी पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप खुणीलाल बोपचे (२४), कार्तिक उमेश मेश्राम (१९) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव असून आयुष् हेमराज सुरसाउत (१९) व एक विधिसंघर्ष बालक या दोघांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. अजूनही एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी वानाडोंगरी नगर परिषद हद्दीत राहतात. आरोपी हे कुणालचे मित्रच आहेत. सर्व जण सोबत दारू घेऊन वसंत विहारच्या पाठीमागे मोकळ्या लेआऊटमध्ये गेले. तिथे दारू पिताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. एकाने मोठा दगड कुणालच्या डोक्यावर मारला. त्यामुळे तो आणखी चवताळला व त्यांना शिव्या देऊ लागला. तेव्हा आरोपींनी त्याला आणखी मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी पसार झाले. आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असता सगळ्यांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.