नागपूर : नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर आणि रामटेक असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र सर्वांचे लक्ष नागपूरच्या लढतीकडे असून येथून गडकरी जिंकणार की काँग्रेस ? हा सध्या चर्चेचा ‘हॉट’ विषय आहे. दुसरीकडे नागपूर इतकीच महत्वाची जागा रामटेकची सुद्धा आहे. येथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत झाली असली तरी खरी राजकीय लढत ही काँग्रेसनेते व माजी मंत्री सुनील केदार विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली. त्यामुळे रामटेकचा निकाल हा तीन नेत्यांपैकी कोण अधिक प्रभावी हे ठरवणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक लोकसभेची निवडणूक काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून गाजली. त्यांनी अर्ज सादर केल्यावर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला जाणे, त्याची तातडीने चौकशी होणे, त्यानंतर ते रद्द केले जाणे, त्या आधारावर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवणे या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष रामटेककडे वेधले गेले. बर्वे या काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक होत्या. त्यांचे निवडणुकीतून बाद होणे हा केदार यांच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का होता. त्यामुळे काँग्रेसने रश्मी बर्वे यांचे पती शामकुमार बर्वे यांना रिंगणात उतरवले तरी खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढल्या त्या रश्मी बर्वे याच. केदार यांनी ही निवडणूकच प्रतिष्ठेची केली. त्यांना जिल्ह्यातील काँग्रेस जणांनी साथ दिली.

हेही वाचा…वर्धेत थरकाप उडवणारी घटना, आतेभावावर गोळया झाडल्या

रश्मी बर्वे यांच्याबाबत घडलेल्या घटनांमुळे त्यांच्याबाजूने लोकांची सहानुभूती गेली. दुसरीकडे रामटेकची जागा मिळावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या भाजपने शिवसेनेला राजू पारवे यांच्या रुपात आयात उमेदवार दिला. त्यामुळे फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख पुसून जावू नये म्हणून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रामटेकमध्ये तळ ठोकून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेसाठी सभा घेतली. यावरून भाजपसाठी ही जागा किती प्रतिष्ठेची आहे हे स्पष्ट होते.

हेही वाचा…ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पंजाबमध्ये, नियोजनासाठी ५ ला बैठक

१९ एप्रिला मतदान झाल्यावर रामटेकच्या गडावर झेंडा कोणाचा ? महायुतीचा की महाविकास आघाडीचा? अशी चर्चा रंगू लागली. काहींच्या मते रश्मी बर्वे यांची जादू चालली तर काहींच्या मते शेवटच्या टप्प्यात शिंदे यांनी स्थिती सांभाळली. महाविकास आघाडी जिंकली तर केदार यांचे ग्रामीण भागातील वर्चस्व कायम असल्याचा संदेश जाईल तर महायुती जिंकली तर याचे श्रेय भाजपचे कौशल्य व शिंदेनी लावलेला जोर याला जाईल. लढत अटीतटीची झाल्याने सर्वांचे लक्ष चार जूनच्या मतमोजणीकडे लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur lok sabha contest become hot topic focus on nitin gadkari vs congress showdown also ramtek seat s real fight eknath shinde and devendra fadnavis vs sunil kedar psg