लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यात नागपूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत आहे. गडकरी आणि ठाकरे यांच्यातील जय-पराजयामधील फरक केवळ ३० ते ४० हजारांवर येण्याची शक्यता आता वर्तवली जावू लागली आहे.

भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी दिल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. काँग्रेसने पश्चिम नागपूरचे आमदार मैदानात उतरवून निवडणुकीत रंग भरला. तरीही प्रारंभी एकतर्फी म्हणजे गडकरी बाजूने ही निवडणूक असल्याचेच चित्र बहुतांश माध्यम रंगवू लागली होती. परंतु जसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसे चित्र पालटू लागले. ठाकरे यांचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहरात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, जातीय समीकरण आणि काँग्रेससाठी मुस्लीम तसेच दलित मतांची अनुकूलता यामुळे ठाकरे यांची हवा तयारी झाली. त्यामुळे गडकरी यांना संपूर्ण नागपूर शहर पिंजून काढावा लागला होता.

आणखी वाचा-नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदार पार पाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कन्हान येथे प्रचार सभा झाली. परंतु या सभेत काँग्रेस मांडलेल्या संविधान बदलाच्या कथनकाला उत्तर देताना भाजप नेत्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले. विकास ठाकरेसाठी मल्लीकार्जुन खरगे आणि मुकुल वासनिक यांनी सभा घेतली. गेल्या काही निवडणुकांत भाजपकडे झुकलेल्या हलबा मतदारांना काँग्रेसने आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खरगे यांची सभा गोळीबार चौकात आयोजित करण्यात आली. तरी देखील प्रचारात जाहीर प्रचार भाजपने बाजी मारली होती. मात्र, मतदानाच्या दिवशीचा माहोल आणि त्यानंतर झालेल्या खासगी सर्वेक्षणात नागपूरची जागा भाजपसाठी सोपी नसल्याचे चित्र समोर आले आहे.

उत्तर नागपूर आणि पश्चिममध्ये काँग्रेसला लिड मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मागील निवडणुकीप्रमाणे भाजपला पूर्व नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये लिड मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, मध्य नागपूर, दक्षिण नागपूरमध्ये यावेळी काँग्रेसची सरशी होण्याचा अमुमान बांधण्यात येत आहे. काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचे समर्थन होते. मागील निवडणुकीत या पक्षाने २५ हजार ९९३ मते घेतली होती तर बसपाने ३१ हजार ६५४ मते घेतली होती. यावेळी बसपाच्या बळ कमी झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी सव्वा लाख मते अधिक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा-नागपूर: वर्षभरात ८४ हजार नवीन वीज जोडण्या; ई- वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठीही…

खासगी सर्वेक्षणात भाजपला धक्का

नितीन गडकरी यांनी २०१९ च्या निवडणुकीत २ लाख १४ हजार ८५९ मतांनी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यावर विजय मिळवला होता. मागील निवडणुकीत एकूण मतदान ११ लाख ७७ हजार १७७ एवढे झाले होते. यावेळी आता १२ लाख सात हजार ३४४ एवढे मतदान झाले आहे. म्हणजे ३० हजार १६७ एवढे अधिक मतदान झाले. काही खासगी सर्वेक्षणाच्या दाव्यावर विश्वास ठेवल्यास काँग्रेसच्या मतांमध्ये सुमारे सव्वा लाख ते दीड लाख मतांची भर पडू शकेल. याचाच अर्थ गेल्यावेळच्या ४ लाख ४२ हजार ७६५ मतांवरून ती ५ लाख ६७ हजार ७६५ वर जाऊ शकेल. काँग्रेस मतांची टक्केवारी वाढणे म्हणजेच भाजपच्या मतांची टक्केवारी कमी होणे आहे. त्यामुळे भाजपच्या ६ लाख ५७ हजार ६२४ मते घटून ५ लाख ६२ हजार ७९१ एवढे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur loksabha seat is not easy for bjp tough fight between nitin gadkari and vikas thackeray rbt 74 mrj