नागपूर : अत्यंत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नागपूर विभागीय अंतिम फेरीत नागपूर येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयाची ‘पासपोर्ट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली.
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या विभागीय अंतिम फेरीत नवप्रतिभा महाविद्यालय नागपूरची ‘द डील’, अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची ‘डेडलाईन’, अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची ‘स्वधर्म’, ललित कला विभाग, रातुम नागपूर विद्यापीठ नागपूरची ‘थेंब थेंब श्वास’ या एकांकिका सादर झाल्या. मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाचही संघांनी कसून तयारी केली होती. त्यामुळे अपूर्व उत्साहात रंगकर्मींनी सादरीकरण केले.
हेही वाचा : गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक; सात नक्षल्यांना कंठस्नान
अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे उपस्थित होते. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनी विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण केले.