नागपूर : ‘तू पहिल्या प्रियकराला सोडून दे, तू मला खूप आवडतेस, तुझ्यावर मी प्रेम करतो आपण लग्न करू,’ अशी मागणी मित्राच्या प्रेयसीला केली. त्यामुळे चिडलेल्या मित्राने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीला ‘प्रपोज’ करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना शनिवारी मध्यरात्री एमआयडीसी परिसरात घडली. बादल भाऊराव निंबर्ते (२४, भीमनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी राज अनिल पाटील (१९, भीमनगर) आणि अर्जुन हरिशंकर कहार (२६) यांना अटक केली. तर दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपुरात पुन्हा हत्यांकांडाची मालिका सुरू झाली असून अवघ्या चोवीस तासांत दोन हत्याकांड घडले आहे.
बादल निंबर्ते आणि राज पाटील हे दोघेही मित्र आहे. दोघांवरही काही गुन्हे दाखल असून बादल हा एमआयडीसीतील एका कंपनीला मजूर पुरविण्याचे काम करतो. राज पाटील हा बेरोजगार असून टोळी घेऊन फिरत असतो. राज पाटीलचे वस्तीतील एका युवतीशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. प्रेयसीची त्याने मित्र बादलशी ओळख करून दिली. त्यानंतर मित्राच्या मोबाईलमधून तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्या तरुणीवर बादलची नजर होती. तो तिच्याशी मोबाईलवर बोलत होता. अनेकदा त्याने मित्राच्या प्रेयसीला घरी सोडून दिले. दोघांची मैत्री झाली आणि तो तिच्या मोबाईलवरून संपर्कात राहायला लागला. दुसरीकडे राज पाटीलला दोघांच्या मैत्रीची कुणकुण लागली. त्याने बादलला प्रेयसीचा नाद सोडण्याची धमकी दिली. त्यावरून दोघांत वाद झाला आणि हाणामारी झाली. त्यानंतर काही महिन्यांतच बादलने राजच्या प्रेयसीला प्रेमाची कबुली देत लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने बादलला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या बादलने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. तिने प्रियकर राज पाटीलला ही बाब सांगितली. प्रेयसीला प्रेमाची मागणी केल्यामुळे चिडलेल्या राज पाटीलने बादलचा खून करण्याचा कट रचला.
हेही वाचा…धक्कादायक..! नागपूर महापालिका म्हणते एकाही जीर्ण इमारतीवर जाहिरात फलक नाही
चौकात बोलावून खून
८ जूनला रात्री अकरा वाजताच्या सुमारास राजने बादलला फोन करून सावित्रीबाई फुले अंगणवाडीसमोर भेटायला बोलविले. तेथे बादल पोहोचला असता राजने प्रेयसीला लग्नाची मागणी घातल्यावरून वाद घातला. त्याने त्याला शिवीगाळ केली. बादलने त्याला रोखले असता राजने मित्र गंगा, अर्जून कहार आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी बादलला मारहाण सुरू केली. अचानक बादलवर चाकूने वार केले तसेच लोखंडी रॉडने वार करत त्याला रक्तबंबाळ केले. त्यानंतर बादलला जखमी अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. बादलला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे वडील भाऊराव यांच्या तक्रारीवरून राजविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राजला रात्रीच अटक केली. तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा…राज्यात विजेची मागणी पाच हजार मेगावॉटने घटली, झाले असे की…
…त्या तरुणीचा पोलीस घेत आहेत शोध
दोघांशीही मैत्री ठेवणाऱ्या त्या तरुणीचा शोध एमआयडीसी पोलीस घेत आहेत. त्या तरुणीचाही या हत्याकांडात सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या तरुणीनेच बादलचा खून करण्यासाठी प्रियकर राज पाटील याला प्रोत्साहन दिले असल्याने पोलिसानी त्या तरुणीचा शोध सुरु केला आहे. या हत्याकांडात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे.