नागपूर : एका बेरोजगार तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जंगलात नेऊन बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोशन मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
२८ वर्षीय तरुणीचे एमसीएमपर्यंतचे शिक्षण झाले आहे. दर रविवारी ती कुटुंबियासह आशीर्वादनगर येथे राहणाऱ्या नातेवाईकाकडे जाते. तेथून संपूर्ण कुटुंब दिघोरी परिसरातील प्रार्थनास्थळावर प्रार्थना करण्यासाठी जाते. गेल्या ५ महिन्यांपूर्वी तरुणीची नोकरी गेली होती. तेव्हापासून ती नोकरीच्या शोधात होती. ३ मार्चला दुपारी दोन वाजता ती हुडकेश्वर परिसरातील सर्वश्रीनगर दिघोरी बसस्थानकाजवळ बसची प्रतीक्षा करीत होती. या दरम्यान रोशन तिच्याजवळ आला. स्वत:चे नाव सांगत एम्स रुग्णालयात सुपरवायझर असल्याची माहिती दिली. बराच वेळपर्यंत तो पीडितेशी बोलला आणि घर-कुटुंबाची सर्व माहिती घेतली. या दरम्यान त्याने तरुणीला नोकरीबाबत विचारले. तिने नोकरीच्या शोधात असल्याचे सांगताच त्याने तत्काळ तरुणीला त्याच्यासोबत रुग्णालयाच्या कार्यालयात येण्यास म्हटले. तरुणीने सोमवारी येतो, असे म्हटले. मात्र रोशनने ‘मॅडम सुटीवर जाणार असल्याने आज बोलणे चांगले होईल’ असे म्हटले. त्याने तरुणीला त्याचा नंबरही दिला. तरुणीने त्याचा नंबर घेतला.
हेही वाचा – अखेर मीरा फडणीस आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; सहा जणांची ४७ लाखांनी फसवणूक
हेही वाचा – स्मृती इराणींचे राहुल गांधींना आव्हान, “आमचा एक साधा कार्यकर्ताही…”
रोशनने तरुणीला दुचाकीवर बसवले. एम्स रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी आऊटर रिंगरोडसमोरील जंगलात घेऊन गेला. जंगलात नेऊन तिला धमकावले आणि जबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा मोबाईल हिसकावून पसार झाला. तरुणीने घटनेची तक्रार हुडकेश्वर पोलिसांकडे केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. तरुणीने रोशनचा मोबाईल नंबर असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करीत रोशनचा शोध लावला. काही तासांतच पोलिसांनी त्याला अटक केली.