नागपूर : इस्रो आणि नासामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी, संशोधक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १११ जणांची ६ कोटी रुपयांनी फसवणूक केली.
या प्रकरणी तक्रारदार आणि साक्षीदार तरुण दोघेही मुख्य आरोपी निघाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. या प्रकरणात हत्येच्या प्रकरणातील आरोपी व सूत्रधार ओंकार तलमलेला अगोदरच अटक झाली होती. आता आणखी दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ओंकार तलमले या आरोपीने नोकरी देण्याच्या नावाखाली रॅकेट सुरू केले होते. दोन व्यावसायिकांच्या हत्या प्रकरणात त्याला अटक झाल्यावर त्याच्या फसवणुकीचे प्रकरण समोर आले. अश्विन वानखेडे (३२, जय दुर्गा सोसायटी, मनिषनगर) याने यात तक्रार केली होती. तक्रारीनुसार अश्विनने त्याच्या नातेवाईकाकडून एक लाख रुपये घेऊन ओंकारला दिले होते.
ओंकारनेदेखील शक्कल लढवत त्याचा विश्वास बसावा यासाठी मे २०२० मध्ये नियुक्ती झाल्याची बतावणी केली व त्याने त्याला एक नियुक्ती पत्रदेखील दिले. पगार ५० हजार रुपये असून, कोरोनामुळे कमी पैसे मिळतील असे सांगत ओंकारने अश्विनला दोन महिने स्वतःच्या बँक खात्यातून पैसे दिले. यामुळे अश्विनचा विश्वास बसला व त्याने इतर नातेवाईक, मित्रांना याची माहिती दिली. त्यानंतर ओंकारने हीच शक्कल इतरांसाठी वापरली आणि १११ जण त्याच्या जाळ्यात फसले.
या प्रकरणात अश्विनच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात ओंकारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास केला असता ओंकारने ५.३१ कोटी रुपये घेतल्याची बाब समोर आली. तर अश्विन व आणखी एक आरोपी चेतन भोसले (३०, दत्तात्रयनगर) यांनी विविध लोकांकडून नोकरीच्या नावाखाली अनुक्रमे २.४७ लाख व एक कोटी रुपये स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक बाब समोर येण्याची शक्यता आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, पंढरी खोंडे, रविंद्र जाधव, अविक्षणी भगत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा – नागपूर : संतप्त गावकऱ्यांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला, काय आहे प्रकरण?
ओमकार हा तोतया नासा शास्त्रज्ञ
कोंढाळी दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार ओमकार महेंद्र तलमले याने मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. स्वतःला नासाचे शास्त्रज्ञ म्हणवत त्याने तब्बल १११ बेरोजगार तरुणांना नासामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तलमलेने पाच कोटी ३१ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ओमकार हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असून त्याने स्वतःच्या खात्यातून राजकीय पक्षाला मोठी रक्कम पक्षनिधी म्हणून दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.