महामेट्रोने तिकीट खरेदी करण्यासाठी डिजीटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून, याकरिता मोबाइल ॲप्स आणि महाकार्डसह अनेक पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहेत. याला उत्तम प्रतिसादही मिळत असून आत्तापर्यत २२ हजारांहून अधिक महाकार्ड्सची विक्री झाल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
शहर बस आणि ऑटोरिक्षाचे प्रवास भाडे वाढल्याने यातून प्रवास करणारा मोठा वर्ग आता मेट्रोकडे वळला आहे. कारण मेट्रोचे भाडे तुलनेने कमी आहे. यामुळे मेट्रोच्या स्थानकांवर गर्दी वाढली आहे. तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. ही बाब टाळण्यासाठी महामेट्रोने स्मार्ट कार्ड म्हणजेच महाकार्ड प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने या कार्डचे संचालन केले जाते. त्याचे स्वरुप डेबिट कार्ड सारखे आहे. कार्ड घेतल्यावर प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. स्थानकावरील प्रवेशव्दारावर फक्त त्यांचे कार्ड‘ टॅप’ करावे लागते. या माध्यमातून प्रवासी भाड्याची रक्कम कार्डमधून वजा केली जाते. महत्वाचे म्हणजे कार्डच्या माध्यमाने मेट्रोने प्रवास केल्यास प्रवाशांना तिकीट दरात १० टक्के सुट दिली जाते. महाकार्ड मेट्रोच्या स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.