नागपूर : वैद्यकीय व्यावसायिकांसाठी महत्वाच्या असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (एमएमसी) निवडणूक ३ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीत नऊ जागांसाठी ४१ उमेदवार मैदानात आहेत. प्रमुख लढत इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रसह (आयएमए) एकूण चार पॅनलमध्ये असून काही स्वतंत्र उमेदवारही आहेत. निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मतदान केंद्र राहणार आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मागील दोन निवडणुकीत आयएमएचा वरचष्मा होता. यंदा आयएमएतर्फे नऊ जागांसाठी नऊ उमेदवार आहेत. त्यात नागपुरातील डॉ. संजय देशपांडे यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनलतर्फेही नऊ उमेदवार रिंगणात असून त्यात नागपुरातील डॉ. मंदार साने, डॉ. धीरज गुप्ता यांचा समावेश आहे. हिलिंग हॅन्ड्स युनिटी पॅनलचेही चार उमेदवार रिंगणात असून त्यात नागपूरकर असलेले माजी अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांचा समावेश आहे. विश्वास पॅनलतर्फे चार उमेदवार रिंगणात आहेत.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठीचे मतदान ३ एप्रिलला सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान होणार आहे. राज्यात ३६ ठिकाणी मतदान केंद्र असून नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वसतिगृह क्रमांक ३ मधील मतदान केंद्रात नागपूर जिल्ह्यातील मतदारांसाठी १६ कक्ष उभारण्यात आले आहेत. इतरही महाविद्यालयांत डॉक्टरांच्या संख्येनुसार कक्षांची संख्या असेल. राज्यभरातील जिल्हा ठिकाणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अथवा महाविद्यालय नसल्यास तेथील जिल्हा रुग्णालयात हे केंद्र राहील. १ लाख ३० हजार मतदार आहेत.

केवळ तीन महिला उमेदवार

निवडणुकीत आयएमएच्या पॅनलमध्ये एकही महिला उमेदवार नसून परिवर्तन पॅनलतर्फे डॉ. संगीता पिकले उमेदवार आहेत. डॉ. उज्ज्वला कराड आणि डॉ. वैशाली कोरडे याही स्वतंत्र उमेदवार आहेत. परंतु महिला दिनानिमित्त हिलिंग हॅन्ड युनिटी पॅनलतर्फे डॉ. उज्ज्वला कराड आणि डॉ. वैशाली कोरडे यांना समर्थन जाहीर केल्याचे, सदर पॅनलचे डॉ. अरुण हुमणे यांनी सांगितले. यावेळी परिवर्तन घडण्याचा दावा परिवर्तन पॅनलचे डॉ. धीरज गुप्ता यांनी केला. डॉक्टरांच्या अडचणीत आयएमएच आवाज उचलते, याकडे आयएमए पॅनलचे डॉ. संजय देशपांडे यांनी लक्ष वेधले.

मतदारांना मनादान केंद्रावर मतदानासाठी ओळख छायाचित्र असलेले महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले नोंदणीपत्र (छायाचित्र असलेले), भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, बँक / टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, वाहनचालक परवाना, स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतन विषयक कागदपत्रे, केंद्र सरकार / राज्य शासन / सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचा-यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (यूडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार. वरील प्रमाणे नमूद बाबींपैकी कोणताही एक पुरावा मतदारांनी आपली ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रांवर दाखविल्यास त्यांना मतदानाचा मतदान करता येणार आहे.