नागपूर : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार अशी शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती.

हेही वाचा : शिंदे- फडणवीस- पवार सरकारची चिंता वाढणार! सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संघटना आंदोलन करणार..

संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब हाेत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नरके यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : पैशांची गरज असल्याने व्यवस्थापकानेच रचला २३ लाखांच्‍या लुटीचा कट

“परीक्षार्थींची संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायला नको म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे”, असे तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur maharashtra talathi recruitment 2023 exam result in january 2024 dag 87 css