नागपूर : नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रत्येक वर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मेयो रुग्णालयातील अस्थिवंगोपचार विभागात विविध हाडांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या ६६ टक्के रुग्णांना पैसेच लागले नाही. या योजनेसह मेयोच्या अस्थिवंगोपचार विभागाबाबत जाणून घेऊ या.
नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) अस्थिव्यंगोपचार विभागाच्या ६६ टक्के शस्त्रक्रिया या महात्मा फुले जनआरोग्य योजना अथवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून झाल्या आहे. या शस्त्रक्रियेतून मेयो प्रशासनाला तब्बल ३ कोटी ६४ लाख ६० हजार ७५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. मेयो रुग्णालयात २०२४ मध्ये एकूण १ हजार ८६३ अस्थिव्यंगोपचार विभागाशी संबंधित शस्त्रक्रिया झाल्या.
दरम्यान मेयो रुग्णालयातील एकूण शस्त्रक्रियैपैकी १ हजार २३१ शस्त्रक्रिया या महात्मा फुले जनआरोग्य योजना अथवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून झाल्या. त्यातही ४६७ शस्त्रक्रिया योजनेत बसल्या नाही. परंतु, या शस्त्रक्रियेला इम्प्लांटची गरज नसल्याने या शस्त्रक्रियेसाठीही रुग्णांना फारशा पैशाची गरज पडली नाही. तर गरीब रुग्ण असलेल्या व योजनेत न बसणाऱ्या ८७ रुग्णांच्या इम्प्लांटचा खर्च समाजसेवा अधिक्षकांच्या पुढाकाराने विविध सामाजिक संस्थांनी उचलला.
मेयो रुग्णालयातील महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील उपचार झालेल्या रुग्णांची एकूण संख्या बघता सर्वाधिक शस्त्रक्रिया व उपचार अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णांवर झाल्याचीही माहिती आहे. या सगळ्या शस्त्रक्रिया अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैजल यांच्या नेतृत्वात झाल्या. तर शस्त्रक्रियेसाठी योजनेतून झटपट इम्प्लांटसह इतर साहित्य मिळवून देण्यासाठी अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांची मदत महत्वाची होती.
योजना
“राज्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनासह केंद्राचीही योजना आरोग्यसेवेतील गेम चेंजर आहे. योजनेमुळे गरीबांना आता मोफत उपचार मिळत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: योजनेत विशेष लक्ष घालून वेळोेवेळी त्यात सुधारणा करत असल्यानेच हे शक्य आहे.”
प्रा. मोहम्मद फैजल, विभागप्रमुख, अस्थिव्यंगोपचार विभाग, मेयो रुग्णालय.
मेयो रुग्णालयातील २०२४ मधील महिनानिहाय शस्त्रक्रिया
महिना | एकूण शस्त्रक्रिया | एमजेपीजेवाय |
जानेवारी | १५३ | ८९ |
फेब्रुवारी | १५९ | १०७ |
मार्च | १४७ | १०४ |
एप्रिल | १५८ | ९९ |
मे | १७२ | १०२ |
जून | १६७ | १०९ |
जुलै | १६८ | १२१ |
ऑगस्ट | १५० | ९८ |
सप्टेंबर | १४७ | ८६ |
ऑक्टोंबर | १५३ | १०९ |
नोव्हेंबर | १४३ | ९८ |
डिसेंबर | १४६ | १०९ |
एकूण | १८६३ | १२३१ |