भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील प्रकार; नळाला रात्री पाणी, स्वच्छतेचाही अभाव
नागपूर : रात्री ९ नंतर नळाला पाणी येत असल्याने आणि सार्वजनिक नळाच्या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याने पाणी भरायचे कसे, असा सवाल करीत, बारसेनगरमधील महिलांनी महापौर नंदा जिचकार यांना बुधवारी घेराव घातला. विशेष म्हणजे, या भागात भाजपचा नगरसेवक असून त्यांच्या कार्यशैलीवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘महापौर आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी प्रभाग क्रमांक २० व २१ मधील काही वस्त्यांना भेटी दिल्या. या दोन्ही प्रभागात भाजप नगरसेवक आहे. या भागातील नागरिकांनी महापौरांसमोर समस्या मांडत अधिकारी व नगरसेवकांना लक्ष्य केले. महापौरांचा दौरा बारसेनगरमधील बुद्ध विहारापासून सुरू झाला. यावेळी नागरिकांनी महापौरांसमोर तक्रारी मांडल्या. या भागात रात्री ९ नंतर नळाला पाणी येते. त्यामुळे अडचणी येत असल्याने ही वेळ बदलून द्यावी, अशी मागणी करीत नळातून येणाऱ्या दूषित पाण्याच्या बाटल्या महिलांनी महापौरांना आणून दाखवल्या. पिण्याची पाण्याची समस्या या भागात आहे. ओसीडब्ल्यूने रस्ते खोदून ठेवले मात्र, अजूनही जलवाहिनी टाकली नाही. नळ जोडण्या दिल्या, पण त्याला पाणी येत नाही. सार्वजानिक नळाच्या ठिकाणी रात्री असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याने तेथे जाणे शक्य होत नाही, असे महिलांनी महापौरांना सांगितले.
बारसेनगरच्या शेजारी असलेल्या तुटलेल्या दादरा पूलची पाहणी केली. या भागातून नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. रात्री वीज राहत नाही. त्यामुळे लुटमारीचे प्रकार घडतात. पाचपावली पुलावरील घाण, जागोजागी कचऱ्याचे ढिग, महापालिकेच्या बंद शाळेत असामाजिक तत्त्वाचे अड्डे आणि त्यामुळे परिसरात असलेली दहशत याकडे नागरिकांनी महापौरांचे लक्ष वेधले. भानखेडा, गोंडपुरा, झाडे चौक, राऊत चौक भागात सिव्हर लाईन आणि पिण्याची पाण्याची समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. लालबहादूर शाळा, कर्मवीर शिंदे शाळा आणि आंबेडकर भवन हे खंडार झाले असून रात्रीच्यावेळी असामाजिक तत्त्वांचा वावर असतो, अशी तक्रार करण्यात आली.
घरकुलासाठी पैशाची मागणी
घरकूल योजनेतून घर मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना पैशाची मागणी केली जाते, अशी तक्रार नागरिकांनी केल्यावर महापौरांनी याबाबत सहायक आयुक्तांकडे तक्रार करा, असे सांगितले.
काँग्रेस नगरसेवकाचा बहिष्कार
प्रभाग २० चे काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी त्यांना महापौरांच्या दौऱ्याची माहिती न दिल्याने बहिष्कार घातला. नगरसेवकांना सांगितले जात नसेल तर जनतेला कसे कळणार, असा सवाल त्यांनी केला.