नागपूर : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत कमी दरात पदवी व पदव्युत्तरचे अद्ययावत शिक्षण मिळते. येथे प्रवेशासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची झुंबळ उडते. त्यानंतरही नागपुरातील मेडिकलमध्ये २०२१ मध्ये पदव्युत्तरच्या १७ जागांसाठी विद्यार्थीच मिळाले नसल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.
मेडिकल महाविद्यालयात पदव्युत्तरच्या विविध विषयांच्या शंभराहून अधिक जागा आहेत. येथे देशाच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. येथील क्लिनिकल श्रेणीतील विषयांना सातत्याने विद्यार्थी मिळत असतानाच नाॅन क्लिनिकलच्या काही विषयांना मात्र विद्यार्थी नाहीत. २०१९ मध्ये येथे पदव्युतरच्या १७ जागांना विद्यार्थी मिळाले नाही. २०२० मध्ये १६ जागा, २०२१ मध्ये १७ जागांवर विद्यार्थी मिळाले नसल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. या जागा नाॅन क्लिनिकलच्या आहेत.
मेडिकलमध्ये एमबीबीएस (पदवी), बीएस्सी पीएमटी, पीजीडीएमएलटी, बीपीएमटी, बीएससी नर्सिंग आणि पदवीचे २०१९ मध्ये ६५२, २०२० मध्ये ६८३, २०२१ मध्ये ६६३ विद्यार्थी होते. त्यातील विविध कारणांमुळे बीएस्सी पीएमटीचे ४ विद्यार्थी महाविद्यालय सोडून गेले. मेडिकल महाविद्यालयाला विविध संस्थांकडून २०१९ मध्ये १३ लाख ५६ हजार ७७ रुपये, २०२० मध्ये १२ लाख १४ हजार ४६७ रुपये, २०२१ मध्ये १६ लाख ११ हजार ९९५ रुपयांचे अनुदान मिळाल्याचेही माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.
सगळ्या संवर्गातील २०९ जागा रिक्त
मेडिकल महाविद्यालयात वर्ग एक ते चारपर्यंतच्या संवर्गात ८०७ पदे मंजूर आहेत. त्यातील २०९ पदे रिक्त असून केवळ ५९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर या महाविद्यालयाची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांच्या शुल्कातून ४५.४१ कोटींचा महसूल
मेडिकल महाविद्यालयाला २०१९ मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध शुल्कातून १९.३२ कोटी, २०२० मध्ये १०.४४ कोटी, २०२१ मध्ये १५.६४ कोटी असे एकूण तीन वर्षांत ४५ कोटी ४१ लाख ५८ हजार ६८३ रुपयांचा महसूल मिळाला.