चंद्रशेखर बोबडे

सर्वाधिक गतीने पूर्णत्वास जाणारा प्रकल्प असे ज्या प्रकल्पाबाबत बोलले जात होते त्या नागपूर मेट्रो प्रकल्पाला पूर्ण होण्यास विलंब होत आहे. अद्यापही कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरून प्रवासी सेवा सुरू होऊ शकली नाही. दरम्यान विलंबामुळे प्रकल्प खर्चातही वाढ झाली आहे. मात्र याचा परिणाम प्रकल्पाच्या पूर्णत्वावर होणार नसल्याचा दावा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

नागपूर मेट्रोचे सध्या दोन मार्ग सुरू झाले, त्यात बर्डी ते खापरी व बर्डी ते लोकमान्य नगर या मार्गांचा समावेश आहे. सेंट्रल एव्हेन्यूची मार्गिका पूर्ण झाली तर कामठी मार्गाचे काम सुरू आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीसाठी खुला होणार होता. पण सध्या केवळ ५० टक्के मार्गावर मेट्रो धावत आहे.

मार्च २०२० मध्ये कोविड महामारीचा नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला. त्यामुळे बांधकामाचा वेग मंदावला आणि प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी वाढला. या सर्वाचा परिणाम प्रकल्प खर्चात वाढ होण्यात झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होणे, भूमी अधिग्रहण कायदा-२०१३ मध्ये संशोधन झाल्यामुळे भूमी अधिग्रहणाची गुंतवणूक वाढणे आदींचा त्यात समावेश आहे. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय देणी वाढली. दरम्यान प्रकल्प खर्चात वाढ झाली तरी प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

मेट्रो ३ च्या कारशेडवरून शिवसेना भाजपाच्या कात्रीत

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक खर्च ८,६८० कोटी रुपये असल्याचे विस्तृत प्रकल्प अहवालात नमूद आहे. आता त्यात १२ टक्क्यांची वाढ होऊन प्रकल्प गुंतवणूक खर्च ९७२० कोटींवर गेला आहे.

याला कारण म्हणजे प्रकल्पाकरिता ५० टक्के कर्ज युरोमध्ये होत आहे आणि युरोची किंमत रुपयाच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. त्यामुळे महामेट्रोला डीपीआरमध्ये नोंद असलेल्या रकमेतून जास्त रुपये जर्मनी आणि फ्रान्सकडून मिळतील. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासद्वारे त्यांच्या वाट्यातील ५५० कोटी रुपयाचे देय आहेत.

Story img Loader