नागपूर : मेट्रोचे सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले होताच मेट्रोमध्ये प्रवाशांची संख्या दिवसाला एक लाखावर गेल्याने महामेट्रोने करोनाळात लागू केलेली तिकीट दरातील सवलत मागे घेतली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना काळात मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या रोडावल्याने महामेट्रोने तिकीट दरात सवलत दिली होती. पाच रुपये ते २० रुपये दर होते. बर्डी ते खापरी व बर्डी ते लोकमान्यनगर अशा दोन मार्गांवर त्यावेळी मेट्रो धावत होती. डिसेंबर ११ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक (कामठी मार्ग) आणि बर्डी ते प्रजापतीनगर (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गावर प्रवाशी सेवा सुरू झाली. शहराच्या चारही मार्गाने मेट्रो धाऊ लागल्याने प्रवाशी संख्येत दुप्पटीहून अधिक वाढ झाली.

हेही वाचा – बुलढाणा : …अन् वृद्ध कलावंत उतरले पैनगंगेच्या नदीपात्रात

सध्या दररोज एक लाखावर प्रवासी मेट्रोतून प्रवास करतात. त्यामुळे मेट्रोने करोना काळातील सवलतीचे दर मागे घेत त्यात सुधारणा केली आहे. पहिल्या दहा किलोमीटर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना वाढीव तिकीट दराचा फटका बसू नये म्हणून त्यात किरकोळ स्वरुपाची वाढ करण्यात आली तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक दर आकारणी करण्यात आली. ६ ते ९ किलोमीटरपर्यंत १०, ९ ते १२ किलोमीटरपर्यंत १५ आणि १२ ते १५ किलोमीटरपर्यंत २० रुपये व १५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी ३५ रुपये दर आकारण्यात येणार आहे. लांबपल्ल्यासाठी म्हणजे २० किलोमीटरपेक्षा अधिक लांबपल्ल्यासाठी प्रवास करणाऱ्यांनाच जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

हेही वाचा – यवतमाळ : देशी दारू दुकान हटवण्याची तक्रार मागे घेण्याचा मोह नगरसेवकाच्या अंगलट

मेट्रोने मात्र इतर शहरांच्या तुलनेत नागपूर मेट्रोचे भाडे अजूनही सर्वात कमी असल्याचा दावा केला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास करावा म्हणून मेट्रो भाड्यात सवलत देण्यात आली होती. आता नागपूरकरांनी मेट्रोचा पर्याय स्वीकारल्याने भाडे पूर्ववत करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur metro decided to increase fair after number of daily passengers crossed one lakh cwb 76 ssb