कामठी मार्गावर ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान रोडपर्यंत सहापदरी सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून जुलै २०१९ पर्यंत बांधकाम होणे अपेक्षित आहे. या सिमेंट रस्त्यांच्या मधोमध मेट्रोचा दुसरा टप्पा करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) नागपूर-कामठी-कन्हान हा १८ किमीचा रस्ता तयार करीत आहे. या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान, नागपूर शहराचा मध्य भाग व उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोचा दुसरा टप्पा प्रस्तावित आहे. त्यानुसार ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी असा १३ किमी मेट्रो मार्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी स्तंभ उभारण्यात येतील. त्यासाठी एनएचएआयने या रस्त्यांचे ‘अलायमेंट’ बदलले आहे. रस्त्याच्या मधोमध तीन मीटरची जागा सोडण्यात आली आहे. सव्वा-सव्वा मीटरवर दोन्ही बाजूला ‘पेव्हर ब्लॉक’ बसवण्यात येणार आहे आणि अध्र्या मीटरचे दुभाजक राहणार आहे. मेट्रोसाठी हे पेव्हर ब्लॉक आणि दुभाजक काढण्यात येतील. त्यामुळे मुख्य रस्त्याला धोका होणार नाही, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सिमेंट रस्त्याचा ‘डिफेक्ट लायबिलिटी’ची मुदत चार वर्षांची आहे, तर रस्त्याची मुदत ३० वर्षांची आहे. जुलै २०१९ ला रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. या काळात रस्त्यांवर खोदकाम झाल्यास कंत्राटदाराची जबाबदारी संपते. मेट्रोच्या कामासाठी तीन मीटर जागा सोडण्यात आली, परंतु रस्त्याला लागून हे काम होणार असल्याने रस्त्याची ३० वर्षांची मुदत (लाईफ), खोदकामाच्या दिवशी संपेल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रारंभीच्या नियोजनानुसार ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान रोडपर्यंतचा रस्ता पूर्णपणे सिमेंटचा करण्याचे होते, परंतु मेट्रोसाठी रस्त्याच्या मध्ये तीन मीटर गॅप सोडण्यात आली आहे. ही गॅप पेव्हर ब्लॉकने भरली जाणार आहे. या रस्त्यांच्या रुंदीमुळे कामठी छावणीतील जमीन घ्यावी लागली. हा २६ मीटरचा रस्ता आहे. त्यासाठी संरक्षण खात्याची ४.५ मीटर जमीन घेण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत २५४ कोटी रुपये आहे.

‘‘मेट्रोसाठी रस्त्यांच्या मधोमध तीन मीटर जागा सोडण्यात आली. तेथे केवळ पेव्हर ब्लॉक राहणार आहे. मेट्रोच्या कामासाठी ते सहज काढता येणार आहेत. सहापदरी सिमेंट रस्त्याच्या मध्ये ही तीन मीटरची जागा त्यासाठीच सोडण्यात आली आहे.’’   – अभिजित जिचकार, प्रकल्प संचालक, एनएचआयए.

Story img Loader