महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावरील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. खापरी मेट्रो स्थानकावर पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने सेंट्रल एव्हेन्यू व कामठी मार्गावरील प्रवासी सेवेला हिरवी झेंडी दाखवली.
हेही वाचा- नागपूर : खासदार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचा लाठीमार; काही युवक जखमी
नवीन सजवलेली मेट्रो ट्रेन सेंट्रल एव्हेन्यूच्या प्रजापती नगर मेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना घेऊन सीताबर्डी इंटरचेंजकडे रवाना झाली. प्रजापति नगर, वैष्णो देवी चौक, आंबेडकर चौक, टेलीफोन एक्सचेंज चौक, चितार ओली, अग्रसेन चौक, दोसर वैश चौक स्थानकांवरून प्रवासी गाडीत बसले. मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींच्या छतावरून तेथील रहिवाश्यांनी फुलांची उधळण करून गाडीचे स्वागत केले. तसेच खापरीहून निघालेल्या गाडीने ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत पहिला प्रवास केला. गड्डीगोदाम, कडबी चौक, नारी स्टेशनचे येथील प्रवासी देखील मेट्रो गाडीत दाखल झाले. मेट्रोच्या आगमनावेळी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.
दोन्ही मार्गिकांवर आनंदाचे वातावरण
सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. चितार ओळी चौकात मारबत उत्सव समितीतर्फे मारबतेचे दृश्य साकारलेल्या मेट्रो खांबाला फुलांनी सजवण्यात आले होते.
पहिला प्रवासी होण्याचा निखळ आनंद
प्रजापतीनगर स्टेशनवरून प्रवास करताना पहिल्या मेट्रो ट्रेनमध्ये जाताना आपल्याला अतीव आनंद होत असल्याचे मनोज यावलकर यांनी सांगितले. लोकमान्यनगरपर्यंतच्या प्रवासाचे पहिले तिकीट मी घेतले आहे. प्रवासी सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या ट्रेनचे पहिले तिकीट काढून मी प्रवास करत आहे याचा आज मला अभिमान वाटतो, अशी भावना मनोज यावलकर यांनी व्यक्त केली