नागपूर : जागतिक दर्जाची मेट्रो अशी नागपूरच्या मेट्रोची ओळख आहे. चकाचक स्थानके, तेथे अत्याधुनिक सुविधा, वातानुकुलीत सेवा आणि जलद प्रवास म्हणून नागपूरकरांनी मेट्रोला पसंतीही दिली आहे. मात्र मेट्रोच्या प्रतिमेला तडा जाणाऱ्या घटनाही घडू लागल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. अशाच प्रकारची घटना मंगळवारी नागपुरात हिंगणा मार्गावर घडली.
नागपूरमध्ये चारही दिशांनी मेट्रोची सेवा सुरू आहे. सुरक्षित प्रवासाचे उत्तम साधन नागपूरकरांना मेट्रोमुळे उपलब्ध झाले आहे. रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी या हेतून ही सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याला नागपूरकरांनी उत्तम प्रतिसादही दिला. शाळा,महाविद्यालयाचे विद्यार्थी मेट्रोने प्रवास करू लागले आहे. मात्र ज्या दर्जाचा प्रचार आतापर्यंत मेट्रो करीत होती, तो ढासळत चाललेला आहे. मंगळवारी दुपारी तांत्रिक कारणांमुळे हिंगणा ते बर्डी मार्गावरील शंकरनगर मेट्रोस्थानकापूर्वी मेट्रो मध्येच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मेट्रो प्रशासनाला ही माहिती कळताच त्यांनी दुसरी मेट्रो पाठवली व बंद पडलेल्या मेट्रोतून सर्व प्रवासी दुसऱ्या मेट्रोत सुरक्षितरित्या हलवण्यात आले. मेट्रोला शंकरनगर स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले आहे. असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. तांत्रिक कारणामुळे मेट्रोत बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. अचानक मेट्रो थांबल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. यापूर्वीही अनेकदा तांत्रिक कारणांमुळे मेट्रोची चाके मध्येच थांबली होती. कधी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तर कधी विद्युत तारांमध्ये अन्य काही बिघाड झाल्याने सेवा खंडित झाली होती.
हेही वाचा : सावधान ! यवतमाळ शहराजवळ पट्टेदार वाघ फिरतोय
मेट्रो प्रकल्प
नागपूर मेट्रोसध्या बर्डी ते खापरी आणि बर्डी ते हिंगणा तसेच बर्डी ते आटोमोटिव्ह चौक व सेन्ट्रल ए्व्हेन्यू या मार्गावर धावत आहे. महाराष्ट्र सरकारने टप्पा एकला २९ जानेवारी २०१४ रोजी या प्रक मंजूरी दिली होती. मुंबई मेट्रोनंतर महाराष्ट्रात नागपूरमध्ये मेट्रो सुरू झाली. या प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात ३१ मे २०१५ रोजी झाली होती. २०१९ मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते व त्यांच्याच हस्ते दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात नागपूर शहरालगतच्या छोट्या शहरांना मेट्रोने जोडण्यात येणारआहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. महामेट्रोकडे या प्रकल्पाचे संचालन आहे. अत्याधुनिक साधन सामुग्रीचा वापर करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.