नागपूर : ओव्हरहेड विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने नागपूरमध्ये खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक या दरम्यान सांयकाळी काही तास मेट्रोची सेवा विस्कळित झाली होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास ती पुन्हा सुरळीत झाली. नागपूरमध्ये मेट्रो टप्पा एक पूर्ण झाल्यानंतर शहराच्या चारही बाजूंना मेट्रो धावत आहे. टप्प्या टप्प्याने मेट्रोच्या प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या दररोज ७० हजाराहून अधिक प्रवासी मेट्रोतून प्रवास करतात. यात शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

शुक्रवारी सांयकाळी खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक या शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेवरील विद्युत वाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे सायंकाळी ६ नंतर सुमारे तासभर मेट्रो सेवा बंद होती. या मार्गावरील काही गाड्या मध्यल्या स्थानकावर थांबवून ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. सेवा विस्कळित झाल्यानंतर महामेट्रो प्रशासनाने तत्काळ सुत्र हलवून दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली. तासाभराने एक मार्ग सुरू करण्यात आला व त्यावरून अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे त्या विलंबाने धाऊ लागल्या. परिणामी मेट्रोचे वेळापत्रक विस्कळीत झाले. सायंकाळी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यांना याचा फटका बसला. दरम्यान रात्री ८ वाजतानंतर बिघाड दुरुस्त करण्यात यश आले. त्यानंतर दोन्ही मार्गावर मेट्रो धाऊ लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. या काळात मेट्रोच्या इतर मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. यापूर्वी जून महिन्यात असा प्रकार घडला होता, अशी माहिती आहे.

हेही वाचा…आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार, केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

दर्जेदार सेवा म्हणून मेट्रोकडे पाहिले जाते. वेळेची बचत आणि वातानुकुलीत प्रवास यामुळे नागपूरकर हळूहळू मेट्रोकडे वळू लागले आहे. त्यामुळेच प्रवाशी संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. वर्धा मार्गावरील मेट्रोची स्थानके मुख्य रस्त्यानजीक असल्याने सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांनी अन्य शहर बस किंवा अन्य साधनांचा वापर करून गंतव्य ठिकाण गाठले. न्यू एअरपोर्ट ते खापरी या दरम्यान मात्र ही सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय झाली.

हेही वाचा…वॉर्ड समितीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचे ‘लाडकी बहीण’वर नियंत्रण

मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. एक वर्षात ही सेवा सुरू होणार असल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे. मेट्रो टप्पा -२ मध्ये नागपूर शहरालगतची छोटी गावे शहराशी मेट्रोने जोडण्यात येणार आहे. नागपूर -वर्धा मार्गावर बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत मेट्रो धावणारआहे. भंडारा रोडवर पार्डीपर्यंत तर हिंगणा मार्गावर हिंगणा गावापर्यंत मेट्रो धावणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही मेट्रो सुविधेचा लाभ मिळणार आहे.