नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाच्या संचालिकेला शिल्लक कारणावरून आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला लावली. त्यानंतर तिचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून सात जणांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनीच दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबरच्या रात्री दहा वाजता नागपूर हिंगणा रोडवरील इलेक्ट्रिक झोन चौकावर पीडित महिला सुचित्रा आपल्या पेट्रोल पंपावर सहकारी कर्मचाऱ्यांसह काम करीत होत्या. त्यावेळी एका दुचाकीवर दोन तरुण पेट्रोल पंपावर आले. काम नसताना इकडे तिकडे फिरू लागले. त्यामुळे पेट्रोल पंप संचालिका सुचित्रा यांनी त्यांना हटकले. या मुद्द्यावरून दोन्ही तरुणांचा सुचित्रा यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला. थोड्यावेळानंतर वाद घालणारे तरुण परिसरातील आपल्या गुंड प्रवृत्तीच्या सहकाऱ्यांना घेऊन पुन्हा पेट्रोल पंपावर आले. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास या गुंडांनी तेथे गोंधळ घातला. ” इलेक्ट्रिक झोन चौकावर आमची दादागिरी चालते, येथे एवढा मोठा कोण झाला आहे, जो आमच्या सहकाऱ्यांना दमदाटी करेल” असे धमकावत सुचित्रा यांना माफी मागण्यासाठी दबाव टाकला. रात्रीच्या वेळी एवढा मोठा जमाव आपल्या विरोधात पेट्रोल पंपावर आला आहे, हे लक्षात घेऊन सुचित्रा यांनी माफी मागितली. मात्र जमावाचा नेतृत्व करणारा राजेश मिश्रा या गुंडाने “ज्या तरुणांशी तुम्ही वाद घातला, त्याच्या पायावर लोटांगण घालून माफी मागावी लागेल” असा हट्ट धरला. त्यामुळे जमावाच्या दबावापुढे नमते घेत सुचित्रा यांना पायावर लोटांगण घालत माफी मागावी लागली. जमावातील काही टवाळखोर तरुणांनी याचे व्हिडिओ चित्रण करून तो व्हायरल केला.
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाच्या संचालिकेला शिल्लक कारणावरून आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला लावली. त्यानंतर तिचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनीच दिली. pic.twitter.com/Al2FIGKFt4
— LoksattaLive (@LoksattaLive) December 20, 2024
हेही वाचा – ‘मुंबई आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, सभागृहात काय घडले…
पोलिसांनी केले गुन्हे दखल
समाज माध्यमावर व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत गुन्हा दाखल केला आहे. धमकावणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे अशा विविध कलमान्वये राजेश मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत सात जणांना अटक केली.