Maharashtra mlc election result 2023 : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या ना.गो.गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ती जागा गेली याला काही भाजपाचं अपयश नाही म्हणता येणार. भाजपाचा एबी फॉर्म नाही, भाजपाचा उमेदवार नाही. जर भाजपा उमेदवार असता तर अजून काही वेगळं चित्र असतं. त्यामुळे मला वाटतं, यावर हुरळून जाण्याची काही गरज नाही.”
याचबरोबर, “कोकणमध्ये आम्ही जिंकलो आहोत. सत्यजित तांबेही आघाडीवर आहेत, त्यांनाही आम्ही समर्थन दिलं होतं. मराठवाड्यातील जागेवर विक्रम काळे यांच्या मतांचा फरक बघा, मागीलवेळी ते कुठे होते आणि आता ते कुठे आले आहेत? १४ हजारांच्यावर मतं आम्ही घेतली आहेत. मागीलवेळी आम्ही हजार, दीड हजार मतंच घ्यायचो. हे निकाल भाजपाने आत्मपरीक्षण करावं, असे नाहीत. खरंतर मराठवाड्यात ती जागा राष्ट्रवादीकडेच होती. महाविकास आघाडीकडे होती, नाशिकची जागाही महाविकास आघाडीकडे होती. नागपुरची जागा मात्र शिक्षक परिषदेची होती ती भाजपाची नव्हती, भाजपा जर स्वत: लढली असतं तर मला वाटतं काहीतरी वेगळं चित्र असतं.” असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
याशिवाय, “अमरावतीमध्ये मात्र अजूनही पूर्ण मोजणी व्हायची आहे. रणजित पाटील हजार-बाराशे मतांनीच मागे आहेत, मला वाटतं वाट बघायला हरकत नाही. नागपुरमध्ये भाजपाचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो.” अस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
गाणार यांना भाजपाने पाठिंबा दिला होता –
गाणार यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मतदानाच्या दिवशीही ठिकठिकाणी गाणारांसाठी भाजपने बुथ लावले होते. प्रचारातही भाजप नेते गाणार हे भाजपचेच उमेदवार असल्याचे सांगत होते.