नागपूर : सार्वजानिक ठिकाणी किंवा रस्त्याने जाता येता पान, गुटखा किंवा अन्य पदार्थ थुंकणाऱ्या व्यक्तीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून सुरू केलेल्या कारवाईत गेल्या पाच वर्षांत ४ हजार ५७८ लोकांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यापासून ७ लाख ८२ हजार ४०० रुपयांची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे, सर्वाधिक थुंकणाऱ्या व्यक्तींची संख्या ही शहरातील सुशिक्षित भाग असलेल्या लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमध्ये असल्याचे वास्तव समोर आले. सार्वजानिक ठिकाणी, शासकीय व निमशासकीय कार्यालय किंवा रस्त्यावर पान, गुटखा किंवा अन्य खाद्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर नागपूरअंतर्गत शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर थुंकत घाण करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू केली.

हेही वाचा – नागपूर : समलैंगिक युवकाची महिला डॉक्टरच्या वेशात भ्रमंती!

त्यात गेल्या पाच वर्षांत शहरातील विविध भागांत ४ हजार ५७८ लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ लाख ८२ हजार ४०० रुपये दंड करून महापालिकेने कमाई केली. विशेष म्हणजे, झोननिहाय माहिती घेतली असता त्यात शहरातील सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर झोनमध्ये १ हजार ७ लोकांवर कारवाई करून १ लाख ८२ हजार ८०० रुपये दंड करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ धरमपेठ झोनमध्ये ५८९ मध्ये कारवाई करून त्यात १ लाख ७ जरा ५३० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध घातले असून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे शहरात तेव्हापासून ही कडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती आणि त्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते, मात्र पुन्हा गेल्या वर्षभरात ही संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पुन्हा गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान.. यापुढे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा खावून थुंकल्यास महापालिका प्रशासनाच्या कारवाईस पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार आहे.

Story img Loader