नागपूर : कुटुंबात मुलगा गणेश, एक लहान मुलगी आणि आई असे तिघे जण राहतात. घरात कमावता कोणीच नाही. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार गणेशच्या आईवर होता. तुटपुंज्या कमाईत घरखर्च भागत नव्हता. गणेशने कामधंदा करून कुटुंबाला हातभार लावावा, अशी आईची अपेक्षा होती. गणेशच्या मदतीने चहा नास्त्याचे दुकान लावण्याचा निर्णय झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यासाठी एका हातठेल्याची गरज होती. जवळपास २५ ते ३० हजार रुपये लागत होते. एवढी मोठी रक्कम कुठून आणणार? असा प्रश्न मायलेकांना पडला. गणेशने आईला पैसे गोळा करण्यासाठी तगादा लावला. आईने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली.

मोठा ताजबाग येथील रहिवासी फिर्यादी समीर शेख (२२) याचा कपडे विकण्याचा व्यवसाय आहे. बेसा पावर हाऊस चौक परिसरात रस्त्याच्या बाजुला तो हातठेल्यावर कपडे विकतो. हातठेल्यास वरून छत आणि लहान कप्पे आहेत. कुलूप लावून तो त्याच ठिकाणी हातठेला ठेवायचा. दरम्यान गणेश त्या परिसरातून नेहमी ये-जा करीत होता. त्याला रस्त्याच्या बाजूला कुलूप बंद एक हातठेला नेहमीच दिसत होता.

हेही वाचा – नागपूर : इस्र, ‘नासा’मध्ये नोकरीचे आमिष; ६ कोटींनी फसवणूक

तशाच हातठेल्याची त्याला गरज होती. आठवडाभर टेहळणी केल्यानंतर, हातठेला बेवारस असल्याचा समज करून गणेशने चोरीचा निर्णय घेतला. मायलेक निर्जनस्थळी ठेला घेऊन गेले. कुलूप उघडल्यानंतर त्यात काही कपडे दिसले. त्यांना कपड्याची नव्हे तर हातठेल्याची गरज होती. कपडे घरी नेऊन ठेवले. परत हातठेला आणण्यासाठी घटनास्थळी गेले. हातठेला घेऊन जात असतानाच पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांना हातठेल्याबाबत विचारणा केली. दोघेही मायलेक घाबरले. सखोल चौकशीत त्यांनी हातठेला चोरून घेऊन जात असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नागेशकुमार चातरकर, शैलेश ठवरे, नंदकिशोर तायडे, गणेश बोंद्रे, राजेश धोटे, मुकेश कन्हाने यांनी केली.

हेही वाचा – नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “

चहाची टपरी दुकान लावण्यासाठी आई व मुलाला एका हातठेल्याची गरज होती. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांच्याकडे हातठेला घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून आई आणि मुलाने मिळून चक्क हातठेलाच चोरला. ढकलत घरी नेत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. या प्रकरणी मायलेकावर गुन्हा नोंदविण्यात आला. गणेश (१८) आणि त्याची आई नीता (४०) रा. गुलमोहर नगर अशी हातठेला चोरणाऱ्या मायलेकांची नावे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mother and son did theft for living adk 83 ssb