नागपूर : शनिवारी झालेल्या पावसाने नागपूरकरांची उडालेली दैना, महापालिकेने केलेल्या पावसाळी कामांचे उघडे पडलेले पितळ, अर्धवट सिमेंट रस्त्यांमुळे नागरिकांचे होत असलेले हाल आणि निगरगट्ट महापालिका प्रशासन यामुळे नागपूरकर नागरिक वैतागले आहेत. नागरी समस्येशी निगडित शेकडो नागरिक तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी चार ऑगस्टला थेट महापालिकेतच जनता दरबार आयोजित केला आहे. त्यामुळे अधिका-यांच्या पोटात गोळा आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नियमितपणे जनसंपर्क कार्यक्रम स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयात घेतात. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतात. तक्रार गंभीर असेल तर तत्काळ अधिका-यांशी फोनवर बोलतात,प्रसंगी फटकारतातही. ही त्यांच्या कामाची स्टाईल आहे. नागरी समस्या आणि सिमेंट रस्त्याच्या कामाला होणारा विलंब या मुद्यावरून गडकरी नेहमीच महापालिका अधिका-यांची कानउघाडणी करतात. आता गडकरी थेट नागपूर महापालिकेच्या मुख्यालयातच जनता दरबार घेणार असल्याने व ते विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकूण घेणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

हेही वाचा : Gondiya Updates: रेल्वेच्या धडकेत शेत मजुराचा मृत्यू

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून गडकरी विजयी झाले असले तरी त्यांच्या मताधिक्यात ८० हजारांहून अधिक मताने घट झाली आहे. नागरी समस्यांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.महापालिकेत सुमारे अडीच वर्षांपासून प्रशासक आहे. अधिकारी ऐकत नाहीत, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असे आरोप माजी नगरसेवकांचे आहेत. सध्या डेंगीची साथ जोरात पसरली आहे. असे असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अलीकडेच महापालिका प्रशासनाच्या विरोधात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आंदोलन केले. नागरी प्रश्नावरून कॉंग्रेसने भाजपला घेरणे सुरू केल्याने याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची रोष लक्षात घेऊन स्वतः गडकरी यांनी पुढाकार घेऊन आपला जनता दरबार मनपाच्या मुख्यालयातच घेण्याचे ठरवले आहे.

गडकरी प्रत्येक महिन्यात खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क कार्यक्रम घेतात. यावेळी चार ऑगस्टला ते सिव्हिल लाईन येथील महापालिकेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महापालिकेशी संबंधित नागरिकांच्या समस्यांची विधानसभानिहाय सुनावणी करतील. याप्रसंगी महापालिका आयुक्त, अन्य अधिकाऱ्यांसह इतर मान्यवरही गडकरी यांच्या समवेत उपस्थित असतील. नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क कार्यक्रमामध्ये मांडण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : वर्धा : ‘डी.एससी.’ उपाधीने सन्मान, मात्र ‘यांचे’ योगदान काय? जाणून घ्या सविस्तर

जनसंपर्काला होणारी गर्दी लक्षात घेता, नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर काउंटर लावले जाईल. या काउंटरवरून नागरिकांना टोकन नंबर दिले जातील. या टोकन नंबरनुसारच नागरिकांना गडकरी यांच्यापुढे समस्या मांडण्यासाठी पाठविले जाईल.

जनसंपर्क कार्यक्रमात येणाऱ्या समस्यांची नोंद घेऊन शक्य त्या प्रकरणात तातडीने कार्यवाहीची सूचना गडकरी देतील. जास्त कालावधी लागणाऱ्या प्रकरणात अर्जदारांना लेखी स्वरुपात सूचित केले जाईल. प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असे गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला सुचविले आहे. महापालिकेच्या मुख्यालयात होत असलेल्या जनसंपर्क कार्यक्रमात सकाळी ११ ते दुपारी पाऊण वाजेपर्यंत पूर्व, उत्तर आणि मध्य नागपूर या तीन विधानसभा मतदारसंघातील मनपाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या जातील. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील समस्या जाणून घेतील.

हेही वाचा : सुलभ आर्थिक धोरणावरच आत्मनिर्भरता अवलंबून; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

भाजप सत्ताकाळात महापालिकेचे वाटोळे

आता मागील अडिच वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक असला तरी त्यापूर्वी तब्बल १५ वर्ष सत्ता भाजपकडे होती. या काळात भाजपने केलेल्या मनमानी कारभारामुळे महापालिकेचे वाटोळे झाले आहे सा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mp nitin gadkari decided to take janata darbar at nagpur municipal corporation cwb 76 css