नागपूर : महाल परिसरातील दंगलीचा कथित मास्टर माईंड फहिम खान यांच्या घरावर नागपूर महापालिका प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सुरू केली आहे. यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतील संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम पडण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेने काल त्याच्या घरावर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली होती. २४ तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक संजय बाग कॉलनीत धडकले. वीज वितरण कंपनीने वीज जोडणी तोडण्यात आली.
नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून) आलेल्या माहितीनुसार, फहीम खान हा या हिंसाचारातील मास्तर माईंड असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या दिवशी फहीम खानने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परिणामी जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप करत नागपूर हिंसाचारातील म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असताना आता नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवण्यात येत आहे. त्यामुळे फहीम खानला आणखी एक मोठा धक्का प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागपूरचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी केली आहे. हिंसाचारात अनेक निर्दोष लोकांना पोलीसांनी आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याची सत्यता तपासली जावी, यासाठी न्यायालयीन चौकशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे.
नागपूरच्या संचारबंदी असलेल्या सर्व भागातून संचारबंदी काल दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवली आहे. त्यामुळे महाल, छत्रपती शिवाजी चौक, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, हंसापुरी या सर्व भागांमध्ये आता सामान्य लोकांचे जीवन पूर्ववत होताना दिसून येत आहे. यात लहान मुलं हसत खेळत शाळेत जात आहेत, छोटे व्यवसायिक आपला व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळच्या मॉर्निंग वॉकसह घरगुती साहित्य घेताना दिसून येत आहेत. ऑटो चालकांची लगबग दिसून येत आहे. मात्र कारण नसताना कुठलाही दोष नसताना हिंसेमुळे आम्ही बरंच काही गमावलं, अशी भावना प्रत्येकांनी व्यक्त केली आहे.