सभागृहातील प्रमुख व्यासपीठावरून महापौराच्या आसनाच्या बाजूला उभे राहून अर्थसंकल्पाचे वाचन करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत यंदा महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुधीर राऊत हे त्यांच्या आसनावरूनच अर्थसंकल्पाचे वाचन करणार आहे.
राज्यात किंवा केंद्रात सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सभागृहातील सर्वोच्च पद असलेल्या अध्यक्षांना त्याची पहिली प्रत दिली जात असताना त्याच धर्तीवर यावर्षी गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत महापालिकेत ही पद्धत सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी मे किंवा जून महिन्यात सादर होणारा अर्थसंकल्प यावर्षी दहा महिन्यांनी म्हणजे २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ३१ मार्चपूर्वी सादर करून त्याला सभागृहाची मंजुरी मिळावी, याउद्देशाने तो रविवारी २७ मार्चला सभागृहात सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प सादर केल्यावर त्यावर सभागृहात चर्चा होऊन त्याला मंजुरी मिळावी म्हणून वेळ देण्यात आला आहे. कसेही करून ३१ मार्चपूर्वी मंजूर होऊन नव्या अर्थसंकल्पानुसार शहराची विकास कामे करणे सोयीचे होईल त्यासाठी स्थायी समिती अध्यक्षाचा प्रयत्न आहे. स्थायी समिती अध्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना आजपर्यंत प्रमुख व्यासपीठावर महापौरांच्या बाजूला उभे राहून तो सादर केला जात होता आणि त्या अर्थसंकल्पाची प्रतही त्यांना दिली जात होती. मात्र यावेळी महापौर समोर बसले असताना सभागृहात सत्तापक्ष नेत्यांच्या शेजारी उभे राहून अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. ही नवीन परंपरा यावर्षीपासून सुरू केली जाणार आहे.
सभागृहातील सर्व सदस्यांजवळ अर्थसंकल्पाची प्रत दिल्यावर स्थायी समिती अध्यक्ष सभागृहात संपूर्ण अर्थसंकल्प वाचून दाखवत होते. मात्र यावर्षी ती परंपरा मोडीत काढली जाणार असून अर्थसंकल्पातील प्रमुख बाबी मांडण्यात येणार आहे. त्यामुळे एरवी एक ते दीड तास वेळ लागणारा अर्थसंकल्प यावेळी पंधरा ते वीस मिनिटात आटोपता घेणार असल्याची माहिती मिळाली. एरवी सभागृहात केवळ सदस्य, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत सादर होणारा अर्थसंकल्प यावेळी जनतेला ऐकायला मिळणार आहे. सभागृहातील प्रेक्षक गॅलरीमध्ये यावेळी शहरातील काही शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि निमंत्रितांना प्रवेश दिला जाणार आहे. माजी स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे यांनी आयुक्ताच्या अर्थसंकल्पात मोठय़ा प्रमाणात बदल केले होते. परिणामी लवकर अर्थसंकल्प सादर करून सुचवण्यात आलेल्या बदलानुसार निधी उपलब्ध करता येणे शक्य होईल. शिवाय निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करता यावी, याकडे स्थायी समितीचे लक्ष लागले आहे. त्यानुसार निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आवश्यक विकास कामांना मंजुरी देऊन लवकरात लवकर पार पाडण्याच्या विचारात महापालिका आहे. दरम्यान, कुठलेही नगरसेवक नाराज होणार नाही याचा विचारही गंभीरपणे केला आहे. अर्थसंकल्पात तुरळक नव्या योजनांचा समावेश करून जास्तीत जास्त भर रखडलेल्या जुन्या प्रकल्पाच्या पूर्तीवर राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader