नागपूर : अपंगांचा एकत्रित डाटा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक अपंग व्यक्तीपर्यंत योजना पोहोचविण्यात अडचण निर्माण होत असल्याने महापालिका लवकरच शहरातील अपंगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य आणि समाज विकास विभागाद्वारे बुधवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून अपंग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी आयुक्त बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल उपस्थित होते.

सर्वेक्षणामुळे पुढील काळात अपंगांच्या उत्थानासाठी कृती आराखडा निश्चित होईल व यात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र, राज्य आणि मनपाच्या सर्व योजनांचा प्रत्येक अपंगाला लाभ पोहोचून त्याच्या जीवनात सुलभता निर्माण करणे हा महापालिकेचा मानस आहे. मात्र अनेक अपंग माहितीअभावी व कागदपत्रांच्या अभावी योजनांपासून वंचित राहतात.

या सर्व कल्याणकारी योजनांचा अपंगांना लाभ पोहोचविण्यासाठी सर्वेक्षण महत्वाचे पाऊल ठरणार आहे. ज्यामुळे पुढील काळात त्याची पूर्तता करुन त्यांना योजनांपासून लाभान्वित करण्यात येईल. यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असून यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची आहे. आरोग्य विभागाशी संबंधित विविध कार्य करताना आशा स्वयंसेविकांचा थेट संपर्क नागरिकांशी येतो. नेहमी त्यांच्या संपर्कात येत असल्यामुळे नागरिकांकडून योग्य माहिती मिळविण्यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. योग्य आणि बिनचूक माहितीमुळे पुढील काळात मोठा ‘डाटाबेस’ मनपाकडे तयार होईल, असा विश्वास डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला.

अतिरिक्त आयुक्त गोयल म्हणाल्या,  जागतिक बँकेच्या अहवालानुसार कोणत्याही देशात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५ ते ८ टक्के एवढे अपंगांचे प्रमाण असते. कुटुंबातील एक व्यक्ती अपंग असल्यास संपूर्ण कुटुंबाची दिनचर्या त्या व्यक्तीच्या अनुरूप सुरु असते. अशा स्थितीत अपंगांना आधार देण्यासाठी अनेक योजना कार्यरत आहेत.

या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आधी अपंगाची ओळख निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील अपंगांना  मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने अपंगाच्या सर्वेक्षणाचे महत्वाचे पाऊल उचलले आहे, असेही त्या म्हणाल्या.

संचालन सिल्विया मोरडे यांनी केले व आभार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी मानले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेद्वारे अपंगाकरिता अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.

Story img Loader