नागपूर : नागपूर महापालिकेमध्ये ५६ सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड व पागे समितीच्या शिफारशी नुसार नोकरीस पात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या परिपत्रकाच्या अनुषंगाने तसेच लाड व पागे समितीने सफाई कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने नागपूर महापालिकेमध्ये कार्यरत सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
गुरुवार या समितीची बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, विधी अधिकारी प्रकाश बरडे, सहायक आयुक्त श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये झालेल्या चर्चे उपरांत गठित समितीने एक मताने एकूण ५६ वारसदारांना नियुक्तीकरिता पात्र ठरविले आहे.
पात्र ठरिवण्यात आलेल्या वारसदारांच्या नावावर नियुक्ती देण्यापुर्वी आक्षेप व हरकती मागविण्याकरिता मनपा मुख्यालय व दहाही झोन कार्यालयांमध्ये ५६ वारसदारांच्या नावाची यादी प्रकाशित करण्यात यावी. प्रकाशित करण्यात आलेल्या वारसदारांच्या नावावर जे काही आक्षेप व हरकती प्राप्त होतील त्यांच्या निराकरण करुन अंतिम यादी पोलिस मुख्यालय, विशेष शाखा, नागपूर शहर यांना पाठवून संपूर्ण ५६ वारसदारांची चारित्र्य पडताळणी प्राप्त करुन घ्यावी, असे निर्देश यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.