नागपूर : शहरात वाढलेली वाहनांची संख्या बघता विविध भागातील वर्दळीच्या २२ ठिकाणी वाहनतळ (पार्किंग) निर्मितीचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र, यापैकी केवळ दोन ठिकाणी वाहनतळ तयार करण्यात आले. उर्वरित प्रस्ताव केवळ कागदावर आहेत. महापालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहने कोठे उभी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरात वाहनांची संख्या वाढत असून त्या तुलनेत वाहनतळ नाही. त्यामुळे मिळेल त्या जागी वाहने उभी केली जातात. त्यातून वाहनकोंडी होते. या समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी शहरातील २२ ठिकाणी वाहनतळ तयार करण्यास प्रशासनाला आदेश दिले होते. या प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. यापैकी सदर आणि कॉटेन मार्केट या दोन ठिकाणी वाहनतळ निर्माण झाले. अन्य जागी होऊ शकले नाही. ते कागदावरच आहेत. रामदासपेठ परिसरात गुरद्वाराला लागून असलेल्या कृषी विद्यापीठाच्या जागेवरील वाहनतळाचा प्रस्ताव धूळखात आहे. ही जागा आता इतरांना देण्याचा घाट घातला जात आहे. सीताबर्डीसह इतवारी, बडकस चौक, महाल, सक्करदरा, सदर, गोकुळपेठ, प्रतापनगर, खामला आदी भागात वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. आता तर तेथेही जागा शिल्लक नाही. महापालिकेने ज्या जागा वाहनतळासाठी निश्चित केल्या त्यापैकी काही जागा छोट्या विक्रेत्यांनी बळकावल्या आहेत.
हेही वाचा : शहीद गोवारी स्मृती दिन आज : गोंडगोवारी असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित; काय आहे गोवारी समाजाच्या समस्या?
इतवारी आणि गांधीबागमध्ये ठोक बाजारपेठा असल्याने जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. तेथे फक्त एकच वाहनतळ आहे. तेथे व्यापाऱ्यांचीच वाहने उभी राहतात. खरेदीसाठी येणाऱ्याच्या वाहनांना जागा उरत नाही. येथे चालताही येत नाही, पण लोक चारचाकी व दुचाकी आणतात. इतवारीत किराणा ओळीमध्ये दुकानासमोर वाहने उभी केली जाते. त्यामुळे वाहनकोंडी होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांसाठी पार्किंगला जागा सोडण्यात आली आहे. मात्र, त्याचे पालन होत नाही. महापालिकेची सूत्रे सध्या प्रशासनाकडे आहे. मात्र, त्यांच्याकडून वाहनतळाच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रस्त्यावरील वााहनकोंडी
हेही वाचा : नागपूर : महिला तलाठ्यासह दोघांना लाच घेताना अटक
अधिक गंभीर होत चालली आहे
रामदासपेठेत काछीपुरा ते बर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक मोठे दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, हाॅटेल्स, शाळा व अन्य दुकाने आहेत. त्यामुळे अनेकदा वाहनकोंडी होते. ज्यूस विक्रेते, वडापाव दाबेली विक्रेत्यंसह इतर फुटकळ विक्रेते रस्त्यावर वाहने उभी करतात. क्रिम्स हाॅस्पिटलच्या समोरील रस्त्यावर असलेल्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर वाहनांसाठी एक पार्किंग स्थळ उभारले आहे. तेथे पाच ते सहा तरुण कामावर ठेवले आहेत. हे तरुण अनेकदा दारू पिऊन असतात व वाहनचालकांसोबत नेहमी वादावादी करतात. रात्री येथे पार्ट्या करून हुल्लडबाजी करतात. त्यामुळे महिला, नागरिकांसह येथील हाॅस्पिटलच्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे.
हेही वाचा : चंद्रपूर : लॉयड मेटल्सकडून परवानगीविना वसाहतीचे बांधकाम, म्हातारदेवी ग्रामस्थ संतप्त
पदपथ झाले वाहनतळ
शहरातील बर्डी परिसरातील फूल बाजार परिसरात अनधिकृत वाहनतळ आहे. महापालिकेचे त्यावर नियंत्रण नाही. पार्किंग झोन म्हणून घोषित केलेल्या जागांवर फुटकळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. शहरातील विविध भागातील फुटपाथवर अनधिकृत वाहनतळ सुरू करण्यात आले आहे. गोकुळपेठ, महाल, बर्डी, रामदासपेठ, आय टी पार्क परिसरात फुटपाथवर वाहने लावली जातात. शिवाय धरमपेठ, वेस्ट हायकोर्ट परिसरात सुद्धा तशीच परिस्थिती असून त्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही.
“वाहनतळासाठी प्रस्तावित जागांची लवकरच पाहणी केली जाणार आहे. काही ठिकाणे पार्किंग झोन म्हणून निश्चित केली आहेत. शिवाय शहरातील बाजाराच्या ठिकाणी वाहनतळासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे.” – निर्भय जैन, अतिरिक्त आयुक्त महापालिका.