नागपूर : नागपूर महापालिकेने मोमीनपुरा येथील हैदरी रोड कॉम्प्लेक्समधील दोन दुकानांचे भाडेपट्टे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फहीम खान आणि हमीद इंजीनिअर यांच्यासह दंगलीतील ५१ आरोपींना अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेने शेख असराफी (फारुकी) यांना भाड्याने दिलेली १२ क्रमांकाची आणि शाहीन हमीद यांना  १३ क्रमांकाची दोन दुकाने भाड्याने दिली होती. त्यांचे नूतनीकरण ११ महिन्यांनी करावयाचे असते. मात्र, या दुकानाच्या गाळ्यांमध्ये युथ फोर्स अँड चॅरिटेबल क्लिनिक अँड पॅथॉलॉजी या नावाने इंडियन मुस्लिम असोसिएशन काम करत असल्याचे पोलिसांना आढळले. दंगलीतील आरोपींनी हे दुकान वापरल्याची बाब तपासात आढळून आल्यानंतर या दुकांनाना टाळे लावण्यात आले होते.    

दंगलीतील आरोपी हमीद यांची पत्नी शाहीन हमीद यांना महापालिकेने दुकान क्रमांक १३ भाडे पट्टे करारावर दिले होते. त्यांनी तीन वर्षांपासून भाडेपट्ट्याची देयके थकविली असून ८४ हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. फारुखी यांना भाड्याने देण्यात आलेल्या दुकान क्रमांक १२ चे भाडे २०१९ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण १.५३ लाख रुपये भरले होते. परंतु मालमत्ता भाडेपट्टावर घेऊन तीन दुसऱ्याला भाड्याने देणे कराराचा भंग आहे. त्यामुळे भाडेपट्टा रद्द केला करण्यात आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ५१ दंगलखोरांच्या मालमत्ता कराच्या नोंदीची चौकशी सुरू केली आहे. संभाव्य थकबाकीदारांची ओळख पटविण्यासाठी अधिकारी मालमत्ता कराचा तपशील तपासला जात आहे.  मालमत्तेच्या नोंदी स्कॅन करताना रहिवाशांमध्ये सामान्य नावांमुळे विसंगती आढळून आली. त्यामुळे दंगलीतील आरोपींच्या साथीदारांचा शोध घेणे आव्हानात्मक बनले आहे. जसे, भालदारपुरा येथील दंगलीतील आरोपीचा शोध घेताना कर अधिकाऱ्यांना ताजबागमध्ये याच नावाने मालमत्ता आढळून आली, अशी माहिती आहे.