मार्च महिन्यात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेला विदेशातून १४० प्रतिनिधी नागपूरला येणार आहेत. दोन दिवसात ते ज्या स्थळांना भेट देणार आहे ते रस्ते गुळगुळीत करण्यात येणार आहेत. २१ व २२ मार्चला नागपूरला परिषदेची बैठक होणार आहे. दोन दिवसात विदेशी प्रतिनिधी नागपुरातील मिहान प्रकल्प, फुटाळा तलाव व पेंच प्रकल्पाला भेट देणार आहेत. पाहुण्यांचा मुक्काम वर्धा मार्गावरील पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहणार आहे.
हेही वाचा >>> अकोला कारागृहातून सुटका होताच रविकांत तुपकरांचा राज्य सरकारवर घणाघात; म्हणाले, ‘हे सरकार…’
महापालिकेच्या माध्यमातून विमानतळ ते प्राईड हॉटेल, रॅडिसन ब्ल्यू हॉटेल, मिहान, पेंच, फुटाळा तलाव या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी बैठक घेतली. त्यात महापालिकेने रस्ते व स्थळांच्या सौंदर्यीकरणाबाबत सादरीकरण केले. ‘सिव्हिल सोसायटी’ ही या परिषदेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्थानिक नागरी संस्थांनी या परिषदेसंदर्भात जागतिक स्तरावर उपयुक्त ठरतील, अशा सूचना व मते उपायुक्त (करमणूक) चंद्रभान पराते यांच्या कार्यालयाकडे द्यावी, असे आवाहन डॉ. बिदरी यांनी केले.