नागपूर : नागपूर महापालिका भांडेवाडी येथील मोकाट जनावरांच्या निवाऱ्याचा पुनर्विकास करणार असून भटक्या कुत्र्यांसाठी रुग्णालय, विलगीकरण केंद्र आणि मोकळा परिसर विकसित करण्यात येणार आहे. सुमारे दीड एकरजागेत रुग्णालय आणि विलगीकरण केंद्र विस्तारले जाणार आहे तर अतिरिक्त दीड एकर जागेवर मोकळा परिसर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनाची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे.

भांडेवाडी जनावरांसाठी निवारा केंद्र आहे. पण, त्यांची अवस्था दयनीय आहे. येथील पायाभूत सुविधा व सेवांबाबत वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या केंद्रात एक पशुवैद्यक आणि एक सहाय्यक आहे. त्यांच्याकडे मोकाट जनावरांना वैद्यकीय सेवा आणि नसबंदी करण्याचे काम आहे. महापालिका आयुक्त डॉ. चौधरी यांनी निवारा केंद्राची पाहणी केली. या भेटीदरम्यान चौधरी यांनी उपचार कक्ष, रेबीज विलगीकरण विभाग, इतर उपलब्ध सुविधांची पाहणी केली. जनावरांना दिल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी अतिरिक्त पशुवैद्यक व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

भांडेवाडी पशूनिवारा केंद्राच्या पुनर्विकासामुळे नागपुरातील भटक्या कुत्र्यांना चांगली वैद्यकीय सेवा आणि सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा आहे. पुनर्विकास आराखड्याला अंतिम स्वरूप मिळाल्याने भांडेवाडी निवारा गृहाचे रूपांतर शहरातील मोकाट जनावरांसाठी सुसज्ज व मानवी केंद्रात करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. नागपूर महापालिकेतर्फे भांडेवाडी येथे प्राण्यांसाठी निवारा केंद्र (शेल्टर) तयार करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये पाळीव प्राण्यांची नसबंदी सुद्धा करण्यात येते. तसेच प्राण्यांना काही इजा झाल्यास त्यावर उपचार करण्याची देखील येथे व्यवस्था आहे. या निवारा केंद्रामध्ये सध्या प्राण्यांचे एक डॉक्टर व एक सहकारी सेवा देत आहेत.

आयुक्तांनी प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेले उपचार कक्ष, रेबीज बाधित श्वानांसाठीचे कक्ष आणि इतर व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेतर्फे या ठिकाणी पाळीव प्राण्यांसाठी एक मोठे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाची देखील माहिती आयुक्तांनी घेतली आणि त्यावर आपले मत मांडले. तसेच त्यांनी प्राण्यांसाठी डॉक्टरांची नियुक्ती करणे, सहकारी स्टाफची नियुक्ती करणे, स्वच्छता ठेवणे आणि एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.