नागपूर : शहरातील सर्व प्रमुख रस्ते सिमेंटचे झाले आहेत. वस्त्यांमधील रस्तेही सिमेंटचे होत आहेत. त्यामुळे दरवर्षी शहराचे तापमान उन्हाळ्यात साधारणत: ४० ते ४५ डिग्री सेल्सिअस असते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्त्यावर पाणी शिंपडण्यात येणार आहे. परंतु, तज्ज्ञांनी याला अजब उपाय संबोधले आहे. तापलेल्या सिमेंट रस्त्यावर पाणी शिंपडले तर पाण्याचे बाष्पीभवन होऊन उकाडा अधिक वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
शहराचे तापमान उन्हाळ्याच्या दिवसात ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिकही असते. या काळात घरोघरी कुलर वापरले जातात. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच वीज भारनियमन करण्याची वेळ येते. आता महापालिकेने सिमेंट रस्त्यावर पाणी टाकून उष्मा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रस्ता दुभाजावरील झाडांना, उद्यानातील झाडांना आणि रस्त्यावर टाकण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. अशाप्रकारे पाणी रस्त्यावर ओतण्याची कल्पना महापालिका प्रशासनाला सुचते कशी, असा प्रश्न तज्ज्ञांनी केला आहे.
वाढता उष्मा आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर उपाय म्हणून महापालिकेतर्फे दरवर्षी उन्हाळ्यात विविध उपायायोजना केल्या जातात. या नियोजनासंदर्भात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची आढावा बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
वर्दळीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी
महापालिकेतर्फे उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची शहरात दरवर्षी अंमलबजावणी केली जाते. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांना सादरीकरणाद्वारे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बस डेपो, पेट्रोल पंप, बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी याकरिता टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा तसेच मार्केट असोसिएशनशी चर्चा करून बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी जागा निश्चित करावी असेही निर्देश त्यांनी दिले.
उद्याने दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहणार
शहरातील सर्व उद्याने दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत सुरु ठेवावेत, टँकरच्या माध्यमातून रस्त्यावर पाण्याची फवारणी करावी, महत्वाच्या चौकात ग्रीन नेट लावण्यात यावी, विविध बांधकाम ठिकाणी कामगारांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता कंत्राटदारांना संपर्क साधावा, रस्त्यावरील प्राण्यांकरिता आणि पक्षांकरिता महापालिकेच्या विविध इमारती, शाळा या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, उद्यानांमध्येही पक्ष्यांकरिता पाणी उपलब्ध होईल अशी सुविधा तयार करावी तसेच रस्त्यावरील प्राण्यांकरिता शेल्टर होम तयार करण्यात यावे, त्यात योग्य वेटिंलेशनची दक्षता घ्यावी, आवश्यकता पडल्यास सामाजिक संघटनांची मदत घ्यावी असेही निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी दिले. महापालिकेच्या विविध इमारतींमध्ये मिस्टिंग कूलिंग लावण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी सूचना केली.