विवाह प्रमाणपत्रासाठी अनेक नवविवाहित जोडप्यांना अडचणी येत असताना ज्या दिवशी विवाह आहे, त्याच दिवशी मंगल कार्यालयातच जोडप्याला विवाह प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महापालिकेत घेण्यात आला होता. त्यासंबंधी योजनाही तयार करण्यात आली. मात्र, दीड वर्ष होऊनही ही योजना कागदावर असल्यामुळे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नवदाम्पत्यांना महापालिकेत चकरा माराव्या लागण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा- नागपूर : विद्यार्थ्यांची माहिती गहाळ; विद्यापीठाच्या चुकीची शिक्षा महाविद्यालयांना
नवविवाह जोडप्यांना विदेशात जायचे असेल किंवा अन्य कामांसाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, ते मिळवण्यासाठी महापालिकेच्या विविध झोनमध्ये त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी या संदर्भात जयपूरच्या धर्तीवर ही योजना तयार केली होती. त्यासंबंधी महापालिकेत प्रस्ताव तयार करण्यात आला होता. लवकरच ही योजना राबवली जाणार असल्याची घोषणा तिवारी यांनी केली होती. ज्या झोनअंतर्गत मंगल कार्यालयात विवाह आहे, त्या ठिकाणी संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांनी विवाहाच्या आधी रितसर सर्व कागदपत्राची तपासणी करून ज्या दिवशी विवाह आहे त्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा- नागपूर : बाळविक्रीसाठी तोतया डॉक्टरांची टोळी; रुग्णालये, परिचारिकाही बनावट
विवाहापूर्वी संबंधित जोडप्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज व अन्य कागदपत्रे झोन कार्यालयाकडे सादर करावी लागणार होती. मात्र, आता दीड वर्षाचा काळ झाला असून या योजनेबाबत महापालिका प्रशासनाक़डून कुठलाही पाठपुरावा घेण्यात आला नसून ही योजना अजूनही कागदावरच आहे. खरे तर या योजनेमुळे अनेक विदेशात जाणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र त्यांना आता केवळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आजही बरेच दिवस वाट पहावी लागत आहे. शिवाय प्रमाणपत्राला जोडणाऱ्या कागदपत्र जमविणे अडचणीचे असल्यामुळे अनेकजण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दुर्लक्ष करतात.
हेही वाचा- अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर बॉम्ब? निनावी फोनबाबत विचारणा केली असता पोलीस म्हणाले…
नवदाम्पत्यांना विवाह प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी बघता जयपूरच्या धर्तीवर ही योजना तयार केली होती. प्रशासनाला याबाबत प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबाजवणी करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, त्या योजनेचे पुढे काय झाले याची माहिती घ्यावी लागेल अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली