महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब प्रकार
महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आरोग्य यंत्रणांकडून उष्माघाताचे रुग्ण वा मृत्यू नोंदवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने सगळ्या पद्धतीला छेद देत शहरातील स्मशानघाटांवरील नातेवाईकांच्या म्हणण्यावरून काही नोंदी उष्माघाताच्या मृत्यूत केल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यातील एक मृत्यू हा खाटेवर असलेल्या पक्षाघाताच्या गंभीर रुग्णाचा, तर दुसरा मृत्यू ह्रदयाशी संबंधित गंभीर गटातील रुग्णाचा नोंदवला गेल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.
महाराष्ट्रासह देशातील सगळ्याच आरोग्य यंत्रणांकडून उष्माघात वा त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद करण्याकरिता एक विशिष्ट पद्धत वापरली जाते. त्यानुसार हा रुग्ण उन्हात वेगवेगळ्या कामाकरिता गेल्यावर त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या आजाराची त्याला लागण व्हायला हवी. सोबत ही नोंद रुग्णावर उपचाराच्या दरम्यान खासगी वा शासकीय रुग्णालयातील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या केस पेपरवर असायला हवी. या दोन्ही नोंदी नसल्यास रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या शवविच्छेदन अहवालातून ही बाब स्पष्ट व्हायला हवी. तसे नसल्यास वैद्यकीयदृष्टय़ा हा रुग्ण उष्माघाताचा मानला जात नाही. परंतु नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघाताचे मृत्यू शोधण्याकरिता अजब वादग्रस्त पद्धत वापरली आहे.
त्यानुसार त्यांनी नोंदवलेल्या उष्माघाताच्या १६ संशयित मृत्यूत आठच्या जवळपास मृत्यू हे शहरातील स्मशानघाटांवर अंत्यसंस्काराच्या दरम्यान नातेवाईकांच्या म्हणण्यावरून तर काही नोंदी शहरातील विविध प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्यांवरूनही नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. हे प्रकरण काही वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आल्याने नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावण्यात आले. हा प्रकार अंगलट येण्याची शक्यता बघता महापालिकेकडून नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त करून या सगळ्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
समितीत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. संगीता मेश्राम, मेयोच्या औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. जोशी, मेडिकलच्या बालरोग विभागातील एक डॉक्टर, मेडिकलच्या पीएसएम विभागाच्या एका डॉक्टरांचा समावेश आहे. समितीकडून निश्चिती झाल्यावरच हे मृत्यू पुढे उष्माघाताचे म्हणून ग्राह्य़ धरले जाणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या १६ मृतांच्या घरी जाऊन त्यांचे केस पेपर तपासण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये एक मृत्यू हा पक्षाघाताचा दीर्घकालीन गंभीर गटातील खाटेवर असलेल्या व्यक्तीचा व दुसरा मृत्यू ह्रदयाच्या दीर्घकालीन आजाराने झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. तेव्हा दोन्ही घटनेमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामावरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.
स्मशानघाटावरील इतर आजाराच्या बळींवर उष्माघाताचा ‘शिक्का’
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावण्यात आले.
Written by महेश बोकडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2016 at 03:48 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur municipal health department registered heatstroke death at graveyard