नागपूर : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून बापलेकाने शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. जितेंद्र गुर्जर (३५) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत संघर्षनगरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाप-लेकाला अटक केली आहे. आनंदराव बावनकर (६०) त्याचा मुलगा दिनेश बावनकर (२६) सर्व रा. संघर्षनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जितेंद्रला आईवडील आणि एक मोठा भाऊ आहे. जितेंद्र बेरोजगार आहे. त्याच्या घराजवळच आरोपी राहतात. त्यामुळे आरोपीसोबत मैत्री होती. दिनेश आणि त्याचे वडील फर्निचरचे काम करतात. मंगळवारी सायंकाळी आरोपी आनंदराव आणि जितेंद्र हे दोघेही दारू पित बसले होते. दारूची नशा चढल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ करू लागले. वाद विकोपाला जाताच आनंदरावचा मुलगा दिनेश हा सुद्धा तेथे आला. मुलगा आल्याने वडिलांना बळ मिळाले. दोघांनीही जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला करत रक्तबंबाळ केले. जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच बापलेक पळाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. परिसरातच असलेल्या आनंदरावला पोलिसांनी लगेच अटक केली. त्यानंतर दिनेशच्याही मुसक्या आवळल्या. त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा : चंद्रपूर : उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील अटकेत; दोन दिवसांची पोलीस कोठडी
चार महिन्यात २९ हत्याकांड
नागपुरात गेल्या जानेवारी ते एप्रिल महिन्यात तब्बल २९ हत्याकांड घडले आहेत. सर्वाधिक ११ हत्याकांड फेब्रुवारीत घडले आहेत. उपराजधानीत गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढत असून टोळीयुद्धातून हत्याकांड घडण्याची संख्या वाढली आहे. यामुळे पोलिसांचा वचक संपल्याचे चित्र आहे.