नागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून औरंगजेबाचा मुद्दा उपस्थित करून वेगवेगळ्या पद्धतीने मुस्लीम समाजाला चिथावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मुस्लीम बांधवांनी संयम पाळला. इतके करूनही हा समाज पेटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर मुस्लिमांसाठी पवित्र अशी ‘आयत’ असलेली चादर जाळण्याचे षडयंत्र रचण्यात आले. त्यातूनच काही भागांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली, असा दावा नागपूर मुस्लीम कम्युनिटीने बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

मध्य नागपुरातील काही भागांत सोमवारी रात्री दंगल उसळली. त्या भागात अजूनही संचारबंदी आहे आणि शेकडो मुस्लिमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात मुस्लीम समाजाची भूमिका मांडण्यासाठी या समाजातील काही बुद्धिजीवींनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शांततेचेही आवाहन केले.

राज्य सरकारने शांतता समिती स्थापन करावी आणि तातडीने संचारबंदी काढून टाकावी, अशी विनंतीही केली. या पत्रकार परिषदेला डॉ. मोहम्मद अवेस हसन, हाजी मोहम्मद ताहिर रजा, मुक्ती मुज्तबा शरीफ, माजी मंत्री अनीस अहमद, अॅड. आसिफ कुरैशी, फैसल रंगूनवाला, अॅड. सैयद शूजाउद्दीन उपस्थित होते.

यावेळी डॉ. मोहम्मद अवेस हसन म्हणाले, मुस्लीम समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने चिथावण्याचा प्रयत्न सुरू आहे. औरंगजेबाचा मुद्दा तर राज्य सरकारमधील एक मंत्रीच सातत्याने उपस्थित करून प्रक्षोभक वक्तव्ये करत आहेत. परंतु, औरंगजेबाशी काही संबंध नसल्याने मुस्लीम समाज शांत राहिला. मुस्लीम भडकत नसल्याचे लक्षात आल्यावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पवित्र ‘आयत’ असलेली चादर आंदोलनात आणली व तिची विटंबना करीत ती जाळली.

मुस्लीम समाजासाठी हा अतिशय भावनिक विषय ठरला. त्यातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. परंतु त्याचा संपूर्ण समाजाशी काही संबंध नाही. आता पोलीस निष्पाप आणि अल्पवयीन मुलांवर एनएसएसारखा गुन्हा दाखल करून त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे. दुसरीकडे जे लोक ही घटना घडण्यास कारणीभूत ठरले त्यांच्यावर नाममात्र कारवाई करून त्यांना दोन तासांत सोडून दिले जात आहे. पोलीस भेदभावपूर्ण व्यवहार करत आहे.

राज्य सरकारने तातडीने ‘शांतता समिती’ स्थापन करावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी आणि लवकरात लवकर संचारबंदी काढून टाकण्यात यावी, अशी मागणीही डॉ. मोहम्मद आवेस हसन यांनी केली.

सरकारकडून एका समाजाची बाजू

राज्य सरकारने दोन्ही समाजाला समान वागणूक देणे अपेक्षित आहे. या दोन्ही समाजात एकोपा राहावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु सरकार एका समाजाची बाजू घेत आहे. मुस्लीम समाजातील लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. अल्पवयीन मुले आणि उच्चशिक्षित लोकांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात येत आहे, असा आरोप माजी मंत्री अनीस अहमद यांनी केला.