नागपूर : नागपुरात बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व नागपुरात नागनदी भरल्याने शहरातील अनेक झोपडपट्टींमध्ये पाणी शिरले. पहाटे अनेक लोकांना घराच्या बाहेर काढून जवळच्या शाळेत आणि समाजभवनात हलविण्यात आले आहे.
नागनदीमधील पाणी उतरत नाही तोपर्यंत आजूबाजूच्या वस्तीमधील पाण्याचा निचरा होणे कठीण आहे. नंदनवन, भांडेवाडी ,पारडी, वाठोडा या भागांतील अनेक झोपडपट्टींमध्ये पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. गंगाबाई घाटाला लागून असलेल्या शिवाजीनगर झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले.
शहरातील अनेक अपार्टमेंटमध्येही पाणी साचले तर काही ठिकाणी खोलगट भागात पाणी जमा झाले. मुसळधार पाऊस लक्षात घेता नागपुरातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. उत्तर नागपुरातील पिवळी नदीच्या काठावरील वस्तीत पाणी शिरले आहे. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पहाटे अडीच वाजेपासून महापालिकेच्या अग्निशमन विभागात पाणी साचल्याचे फोन येऊ लागल्याने पहाटेपासूनच महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.