नागपूर : सार्वत्रिक निवडणुका आल्या की केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षाला नागपूरच्या नाग, पिवळी नदीची आठवण येते. वेगवेगळ्या समित्यांची घोषणा केली जाते. याच क्रमात राज्य शासनाने नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाकरिता नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय पर्यावरण तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. ही समिती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सल्ला आणि मार्गदर्शन करणार आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात बुधवारी ६ सप्टेंबरला शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार नागपुरातील नागनदी, पिवळी नदी व बोर नाला यांचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून प्रदूषणमुक्त करण्याकरिता महापालिकेने प्रकल्प हाती घेण्यास केंद्र व राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १९२६.९९ कोटी आहे. या प्रकल्पाला जपानकडूनही अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत महापालिकेने राज्य शासनाकडे पत्र पाठवले होते. त्यानुसार वरील समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – एमपीएससीकडून दोन महिन्यांतच मोठ्या परीक्षेचा निकाल जाहीर; उत्तीर्ण उमेदवारांनो आता…

हेही वाचा – राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; विदर्भ व मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’

समितीत डॉ. वसंत म्हैसाळकर (निवृत्त प्राध्याप व्हीएनआयटी), डॉ. टी नंदी (शास्त्रज्ञ, नीरी), डॉ. किशोर मालवीय (पर्यावरण तज्ज्ञ), डॉ. दर्यापूरकर (लार्स एन्हायरमेंट), डॉ. शशिकांत हस्तक (माजी अभियंता महापालिका नागपूर), डॉ. दीपांकर शोम (पर्यावरण तज्ज्ञ) यांच्यासह महापालिकेचे आयुक्त व इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. यापूर्वीही नागनदी स्वच्छतेबाबत अनेक घोषणा झाल्या, समित्या स्थापन झाल्या, केंद्र – राज्य सरकारचे आराखडे जाहीर झाले. नागनदी आहे तशीच आहे, प्रदुषित.

Story img Loader