राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस
जगातील हिरव्या शहरांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणारे नागपूर शहर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत आल्याने पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवींसह शहरातील नागरिकांनाही धक्का बसला. जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालावर टीकेची झोडही उठली. मात्र, वास्तविकतेत नागपूर शहरातील हिरवळ प्रदूषणाला रोखण्यासाठी पर्याप्त नाही. शहराची वाढती लोकसंख्या, त्यातून निर्माण होणारा घनकचरा, सांडपाणी यामुळे शहर प्रदूषणाच्या खाईत लोटले गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या शहरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी आजही जुन्याच मलवाहिन्यांचा वापर केला जात आहे. शहराची लोकसंख्या १० लाखाच्या घरात असताना तयार करण्यात आलेल्या मलवाहिन्या, शहराची लोकसंख्या ४० लाखाच्या घरात पोहोचल्यानंतरही त्याच आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या मलवाहिन्या फुटून जमिनीत सांडपाणी झिरपत आहे. त्यामुळे मृदा प्रदूषणाच्या नव्या समस्येला नागपूरकरांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय, झोपडपट्टय़ांमधील घाण तलावात जात असल्यामुळे तलावाच्या पाण्यांमधील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. प्रामुख्याने फुटाळा तलावाच्या काठावरील झोपडपट्टय़ांची घाण आणि गणपती विसर्जनामुळे या तलावाला प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आज हे शहर तब्बल ५०० एमएलडी सांडपाणी दररोज निर्माण करते. सांडपाण्यासोबतच हे शहर दररोज ११०० हजार मेट्रीक टन कचरा प्रत्येक दिवशी निर्माण करते. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा भांडेवाडीतील प्रकल्प तीन वर्षांपूर्वी आगीच्या कचाटय़ात सापडल्यानंतर तीन वर्षांत त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे कचऱ्याची साठवणूक हासुद्धा एक मोठा प्रश्न आहे.
हिरव्यागार शहरांच्या यादीत शहर पहिल्या पाचमध्ये असले तरीही झाडांच्या तुलनेत सिमेंटचे जंगल मोठे आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत झाडांची संख्या कमी आहे. एका व्यक्तिमागे किमान तीन ते कमाल १७ झाडे आवश्यक असताना शहरात १२१ व्यक्तीमागे १०० झाडे, अशी संख्या आहे. त्यातही धूळ शोषून घेणाऱ्या वृक्षांची संख्या तुलनेने अतिशय कमी आहे. शोभिवंत झाडे अधिक आणि ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे कमी आहेत. शहर हिरवेगार असले तरीही हवेतील प्रदूषण रोखण्यात ती समर्थ नाहीत. अजूनही वेळ गेलेली नसून शहरातील पर्यावरणाचे नियोजन करण्यात महापालिका यशस्वी ठरली तर प्रदूषित शहराच्या यादीतून हे शहर बाहेर निघण्यास वाव असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.

Story img Loader