लोकसत्ता टीम
नागपूर : राष्ट्रवादी एकसंघ होती तेंव्हाही या पक्षाचा विदर्भात प्रभाव नव्हता. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग हीच या पक्षाची विदर्भातील राजकीय ताकद. पक्षफुटीमुळे ती सुद्धा निम्म्यावर आली. अजित पवार यांच्याकडे मुळ पक्ष गेला असला तरी या गटाला जनमानसात स्थान नाही. त्यामुळे हा गट चर्चेत नसतो. मात्र अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाबाबत व ते वापरण्यासाठी काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत.
‘घड्याळ चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’ असा संदेश फलकावर लिहिण्याची अट राष्ट्रवादी काँग्रेसला घालण्यात आली आहे. तरीही नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकावर असा कुठलाही संदेश नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आणखी वाचा- “मामाला तिकीट देत नसाल तर मला द्या”, खासदाराच्या भाच्याचा थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रस्ताव…
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने मान्यता देत चिन्ह बहाल केले. त्याला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. अलीकडेच यावर सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयाने काही अटी, शर्ती घालून राष्ट्रवादी काँग्रेसला ‘घड्याळ’ चिन्ह दिले. त्यानुसार फलक, बॅनर्स, पोस्टर किंवा प्रचार पत्रकावर चिन्हाचा वापर करायचा असेल तर त्यावर ‘घड्याळ चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’ असा संदेश लिहिणे बंधनकारक आहे. पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाच्या फलकावरही याबाबत माहिती पत्रक चिटकवण्यात आले आहे, मात्र नागपूरच्या बजाजनगरजवळील कार्यालयाबाहेरील फलकावर असा कुठलाही संदेश किंवा न्यायालयाने घातलेल्या अटींबाबत काहीही माहिती लिहिलेली नाही.
“याबाबत अद्याप पक्षाकडून आदेश आले नाहीत. ते आल्यावर आदेशाचे पालन केले जाईल.” -प्रशांत पवार, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.