नागपूर : शहरातील नामांकित औषधविक्रेत्याने बहिणीच्या मुलाला दुकानात व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्या युवकाने मामाच्या दुकानात १५ कोटींचा गैरव्यवहार करीत दीड कोटी रुपये प्रेयसी आणि डान्सबारवर उडवले. या प्रकरणी मामाच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भाच्यास अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. देवेश चोरडीया (३२, सरजू टाऊन, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra Rain News: सावधान…पाऊस पुन्हा परतला, आता ‘या’ भागात मुसळधार…

इंदरचंद लखीचंद जैन (६८, शांतीनगर कॉलनी) हे शहरातील नामांकित औषध व्यवसायी आहेत. त्यांची कोट्यवधीत वार्षिक उलाढाल आहे. त्यांच्या गंजीपेठ येथे असलेल्या जयहिंद फार्मकेअर संदेश दवा बाजार नावाने औषधालय आहे. मोठा व्यवसाय असल्यामुळे दुकानात आपल्या विश्वासाची व्यक्ती असावी म्हणून जैन यांनी आपल्या बहिणीचा मुलगा देवेश चोरडीया याला दुकानात व्यवस्थापक म्हणून ठेवले. गेल्या २०२१ पासून देवेश हा दुकानात नित्यनियमाने नोकरी करायला लागला. सुरुवातीला त्याने सर्वच काम शिकून घेतले आणि औषध विक्री-खरेदीचा व्यवहार स्वत: करायला लागला. भाच्याच्या हातात व्यवहार असल्याने मामा जैन यांनी विश्वास ठेवला. यादरम्यान, त्याला दारु आणि डान्सबारचा शौक लागला. तो दुकानातील काही पैशाचा गैरव्यवहार करून मुंबईला जाऊन डान्सबारमध्ये पैसे उडवायला लागला. त्याला डान्सबारचे व्यसन लागल्याने तो दर १५ दिवसानंतर तो विमानाने जाऊन मौजमजा करीत जात होता. यादरम्यान देवेशला मुंबईतील एक पबमध्ये एक तरुणी भेटली. तिला पाहताच देवेश तिच्या प्रेमात पडला. दोघांची मैत्री झाल्यानंतर तरुणीने देवेशकडील कोट्यवधी रुपयांची उलाढाल बघता तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली. प्रेयसीसाठी तो काहीही करायला तयार होत होता. प्रेयसीला महागडे गिफ्ट आणि हॉटेलिंग करायला तो नागपुरातून मुंबईला जात होता. डान्सबार आणि प्रेयसीवर तो लाखो रुपये उडवायला लागला.

हेही वाचा : लोकजागर- वैनगंगा ते नळगंगा!

मामाचे पैसे स्वत:च्या खात्यात

मामा जैन यांना ज्योत फार्मा नावाची कंपनी स्वस्तात औषधी देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी काही पैसे अॅडव्हान्समध्ये द्यावे लागेल, असे सांगून एक कोटी रुपये उकळले. त्यानंतर ज्योत फार्मा नावाची बनावट कंपनी स्थापन करून त्या कंपनीच्या नावाने स्वत:चे बँक खाते काढले. नागपुरातील एका कंपनीकडून औषध विकत घेऊन तो ज्योत फार्माच्या नावाने खपवून घेत होता. त्यातून मामाचे पैसे स्वत:च्या खात्यात वळते करीत होता. अशाप्रकारे त्याने ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ यादरम्यान तब्बल १५ कोटी रुपयांची मामाची फसवणूक केली. मात्र, त्याने बँक खात्यात केवळ दीडच कोटी रुपयांचा व्यवहार केला. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी देवेशविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur nephew spent 15 crores dance bar and 1 5 crores on girlfriend commits fraud at uncle medical shop adk 83 css