मंडळालाच धडे गिरवण्याची गरज
जिल्हास्तरावर निवड होऊन राज्यस्तरावर ‘सायन्स मॉडेल’ प्रदर्शित करण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ढिसाळ नियोजनाचा फटका बसला असून, विविध समस्यांचा सामना करावा लागला. यामुळे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना शिस्त आणि नियोजनाची सवय लावण्याची भूमिका घेणाऱ्या शिक्षण मंडळालाच त्याचे धडे देण्याची गरज आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यभरातून एक हजार ५० विद्यार्थी आपल्या विज्ञान प्रतिकृतीच्या प्रदर्शनासाठी तीन दिवस नागपुरात होते. शालेय विद्यार्थी असल्याने साहजिकच प्रत्येक विद्यार्थ्यांमागे एक याप्रमाणे तेवढेच शिक्षक देखील आले होते. शहराच्या बाहेर कळमेश्वर मार्गावरील गुरुनानक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. ‘इन्स्पायर अवॉर्ड’ योजनेअंर्तगत २२ ते २४ सप्टेंबरदम्यान आयोजित या प्रदर्शनासाठी राज्यातून विद्यार्थी येणार असल्याने त्यांना एक दिवसआधी बोलवण्यात आले. मात्र २१ सप्टेंबरला आयोजकांकडून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दुपारच्या जेवणाची सोयच करण्यात आली नव्हती. अनेकांना जेवणाचे कूपन्स मिळाले नव्हते. आयोजकांनी मात्र कूपन्स असेल तर जेवण मिळेल, असे सांगत होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि अखेर नमते घेत कूपन्सचा आग्रह सोडावा लागला. शिवाय आयोजकांना विद्यार्थी आणि शिक्षकांचा अंदाज येऊ न शकल्याने जेवणही पुरले नाही. प्रदर्शनाला सुरुवात होण्याआधीच उडलेला नियोजनाचा बोजवारा समारोपाच्या दिवसापर्यंत उडालेलाच होता.
उद्घाटन, समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात सर्व विद्यार्थी, शिक्षकांना सामावून घेता आले नाही. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येबाबत आगाऊ माहिती असताना कमी क्षमतेचे मंडप उभारण्यात आले. त्याचाही फटका विद्यार्थी आणि शिक्षकांना बसला. अध्र्याहून अधिक विद्यार्थ्यांना मंडपाबाहेर उभे राहून कार्यक्रम बघावे लागले. एवढेच नव्हे तर मॉडेलच्या शेजारी विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आली नव्हती. यामुळे सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन दिवसांहून अधिक काळ उभे राहावे लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना पाय, कंबर आणि पाठीचा कणा दुखीचा त्रास जाणवू लागला, असे काही विद्यार्थी आणि शिक्षकांचे म्हणणे आहे.
विज्ञान प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी देखील नियोजनातील घोळ कायम होता. प्रदर्शनाचा समारोप २४ सप्टेंबरला दुपारी निश्चित करण्यात आला होता. परंतु कामाची वाटणी आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नसल्याने शिक्षकांना ‘रिलिव्ह लेटर’ मिळण्यासाठी सायंकाळचे ५ वाजले. नोंदणी काऊंटवर ‘रिलिव्ह लेटर’ मिळतील, अशी उद्घोषणा आयोजकांनी केली. मात्र त्या तेथे काऊंटर आणि प्रमाणपत्राचे पुडके याशिवाय कुणीच नसल्याने पुन्हा अवस्थेत भरच पडली. शिक्षकांनीच आपापले प्रमाणपत्र गठ्ठय़ातून शोधून घेतले आणि गावाकडे परतले.
शाळकरी मुलांमध्ये विज्ञानाची अभिरुची निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्यातील संशोधनवृत्तीला चालना मिळावी म्हणून ‘इन्स्पायर अवॉर्ड’ योजना आहे.
या योजनेनुसार विद्यार्थ्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विज्ञान प्रतिकृती बनवणे अपेक्षित असते.
ढिसाळ नियोजनाचे ‘इन्स्पायर’शिक्षण
जिल्हास्तरावर निवड होऊन राज्यस्तरावर ‘सायन्स मॉडेल’ प्रदर्शित करण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ढिसाळ नियोजनाचा फटका बसला
Written by चैताली गुरवguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-09-2015 at 07:54 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur news science model