नागपूर: भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हे २०३० पर्यंत सुमारे चार कोटी तरुणांना रोजगार देणारे क्षेत्र ठरेल, अशी माहिती केंद्री मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या क्षेत्रातून रोजगार कसा निर्माण होणार, त्याबाबतही गडकरी यांनी भाष्य केले. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नागपूरच्या राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय- एनएफएससी येथे ‘इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत गडकरी बोलत होते. याप्रसंगी एनएफएससी नागपूरचे संचालक एन. बी. शिंगणे, उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, लिथियमचे जगातील सुमारे ६ टक्के साठे हे जम्मूमध्ये सापडले. त्यामुळे हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात ६० कोटी इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरण्यात येईल.
या साठ्यामुळे भारतात लिथियम आयन बॅटरीची किंमत कमी होईल. मागील तीन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमध्ये आगीच्या घटना घडल्या. त्याचा ई- वाहन बाजारावर परिणामही झाला. परंतु रक्षा संशोधन विकास संस्था डीआरडीओ तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी यांच्या तज्ज्ञ कमिटीने बॅटरी सुरक्षा यावर संशोधन केले आहे. ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीज स्टँडर्ड अर्थात एआयएस या सुरक्षा मानांकनाने बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली असून इलेक्ट्रिक बसेसमध्ये फायर डिटेक्शन अलार्म सुद्धा अनिवार्य केला आहे. ईव्ही बॅटरी वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातील नियम केंद्रीय परिवहन मंत्रालयाने २०२२ मध्येच आखले आहेत. त्यात बॅटरी रिकव्हरी आणि रिसायकलिंग व्यवस्थापनाकरिता बॅटरी उत्पादकांवर हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.
हेही वाचा : नागपूर : थंडी पुन्हा परतणार, पण कधीपासून? हवामान खाते म्हणते….
तणस, परळी, उसाच्या मळीपासून ‘बायो सीएनजी’
हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर व प्रदूषणमुक्त असे इंधन उपलब्ध होणार आहे. शेतातील तणस, परळी, ऊसाची मळी यापासून बायो सीएनजीच्या निर्मितीचे ४०० प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी ६० प्रकल्प सध्या सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातही राईस हस्क पासून बायो सीएनजीचा प्रकल्प सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा : ईव्हीएमविरुद्ध शंखनाद…मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात…
इलेक्ट्रिक वाहन खरेदीची स्थिती
देशात सुमारे ३० लाख इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत असून २०२३- २०२४ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. २०२४ मध्ये एकूण बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण हे ६.४ टक्के आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये ५६ टक्के विक्रीचे प्रमाण हे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये ४०० हून अधिक स्टार्टअप निर्माण झाले असून २०२५ पर्यंत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील प्रमाण हे ८ टक्के पेक्षा जास्त होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.