नागपूर: रिपाईच्या सर्व घटक पक्षांचा समावेश असलेल्या संयुक्त रिपब्लिकन आघाडीची बैठक सोमवारी नागपुरातील रवीभवन येथे संपन्न झाली. याप्रसंगी तत्कालीन अध्यक्ष भूपेश थुलकर यांना संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. तर नवीन अध्यक्षांची निवड करून त्यांना पदभारही सोपवण्यात आला. बैठकीत एक स्लोगनही निश्चित झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवीभवन येथे आयोजित बैठकीला नागपूरसह वेवेगळ्या भागातून रिपाईच्या विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. भूपेश थुलकर यांना अध्यक्षपदावरून काढण्याचा ठराव मंजूर झाल्यावर सर्व घटक पक्षातील संघटना व पदाधिकारी यांनी बहुमताने अमृतराव गजभिये यांचा अध्यक्ष पदाकरीता ठराव मांडला. नवीन अध्यक्षांचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर गजभिये यांची अध्यक्षपदी नियुक्ती करून पदभारही सोपवण्यात आल्याची माहिती संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख, व संयोजक प्रकाश कुंभे यांनी दिली.

हेही वाचा – शाळेतील मुलांच्या डब्यात आता जंक फूड नको, तर… प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मत

बैठकीत रिपब्लिकन आघाडी, रिपब्लीकन जनतेच्या विविध स्तरावर येणाऱ्या समस्या, शासनाची भूमिकासह इतरही सामाजिक, राजकीयसह इतरही विषयावर गांभिर्याने चर्चा झाली. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर नागपूर विधानसभा निवडणूक संयुक्त रिपब्लिकन आघाडीकडून लढण्यावर सर्वांनी भर दिला. याप्रसंगी सगळ्यांनी मिळून एक स्लोगन निश्चित केले. त्यात “नो काँगेस, नो भाजपा, ओन्ली रिपब्लिकन” हा नारा सभेत पास करण्यात आला.

उत्तर नागपुरात मागील काही निवडणुकीत रिपब्लिकनचा जनाधार कमी झाला होता. त्यामुळे पक्ष खूपच माघारला आहे. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकनचाच उमेदवार उभा करून रिपब्लिकन व आंबेडकरी जनता निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा सूरही बैठकीत उमटला, असे प्रकाश कूंभे यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले. त्यासाठी आतापासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून कामावर लागण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तर रिपब्लिकनमधून चांगले उमेदवारांचा शोध घेण्याबाबतही याप्रसंगी चर्चा झाली.

हेही वाचा – गडचिरोलीत नक्षलवाद्यांची चहूबाजूंनी कोंडी; आणखी पाच गावांनी केली प्रवेशबंदी

बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे होते. बैठकीचे प्रास्ताविक दिनेश गोडघाटे यांनी केले. तर बैठकीचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रकाश कुंभे यांनी केले. बैठकीला नवनिर्वाचित अध्यक्ष अमृतराव गजभिये, प्रा. पी. डी. बोरकर, कैलास बोंबले, दिनेश गोडघाटे, प्रकाश कुंभे, आणि इतरही नागपूरसह वेगवेगळ्या भागातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur no congress no bjp only republicans what happened at the meeting of the united republican alliance mnb 82 ssb