नागपूरमध्ये करोनासह ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत असतानाच आता ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण वाढताना दिसत आहे. मागील सहा दिवसांत येथे ८ नवीन रुग्ण आढळल्याने, येथील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १४ वर पोहचली आहे. त्यापैकी ८ गंभीर संवर्गातील रुग्ण विविध रुग्णालयांत आहेत.

बहुतांश रुग्ण मागील महिनाभरात आढळले –

यावर्षी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात एकही ‘स्वाईन फ्लू’चा रुग्ण आढळला नाही. या आजाराच्या चाचण्याच मुळात निवडक झाल्याने ही स्थिती असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यानंतर २०२१ मध्ये नागपूर विभागात या आजाराचे ६ रुग्ण आढळले. परंतु, २०२२ मधील सात महिन्यात १४ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील बहुतांश रुग्ण हे गेल्या महिन्याभरात आढळले आहेत.

सर्वाधिक ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील –

दरम्यान, आढळलेल्या एकूण १४ रुग्णांमध्ये १२ नागपूर जिल्हा, १ चंद्रपूर जिल्हा, १ छिंदवाडा येथील रुग्णाचा समावेश आहे. तर एकूण रुग्णांमध्ये १० पुरुष आणि ४ महिला आहेत. तर सध्या नागपुरातील विविध रुग्णालयांत ८ गंभीर संवर्गातील स्वाईन फ्लूग्रस्तांवर उपचार सुरू आहेत, तर ६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागपूर जिल्ह्यातही सर्वाधिक ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील आहेत.

संक्रमण थांबवण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान –

दरम्यान, या सगळ्या रुग्णांच्या आजाराचे निदान हे खासगी प्रयोगशाळेत झाले आहे. त्यामुळे बहुतांश रुग्ण हे खासगी रुग्णालयांतच उपचाराला आल्याचे वास्तव आहे. ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण झपाट्याने होते. त्यामुळे या आजाराचे संक्रमण थांबवण्याचे मोठे आव्हान आता आरोग्य विभागावर आहे. २०१५ मध्ये स्वाईन फ्लूने डोके वर काढले होते, त्यावेळी ७९० रुग्णांपैकी १७९ रुग्णांचा मृत्यू झाला होता.